रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु; अहवाल आणा मगच करु दाखल, रुग्णालयांनी केले हात वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 03:28 PM2020-07-04T15:28:26+5:302020-07-04T15:28:33+5:30
मानपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाची प्रकृत्ती अचानक बिघडली, त्यामुळे शुक्रवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याच्या नातेवाईंकानी धावपळ सुरु केली.
ठाणे: कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्युचे प्रमाणही ठाण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्रशासनाच्या चुकांमुळे देखील काहींना आपल्या प्राणांना नाहक मुकावे लागल्याच्या घटना एका मागून एक समोर येत आहे.
मानपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाची प्रकृत्ती अचानक बिघडली, त्यामुळे शुक्रवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याच्या नातेवाईंकानी धावपळ सुरु केली. शहरातील तीन चार खाजगी रुग्णालयात त्याला नेण्यात आले. परंतु या रुग्णालयांनी आधी कोरोनाचा रिपोर्ट आणा मगच दाखल करु असे सांगितले. शेवटी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेता नेता या रुग्णाचा रिक्षात त्यांचा मृत्यु झाला.
घोडबंदर भागातील एका व्यक्तीला मागील काही दिवस त्रस सुरु होता. त्यामुळे त्याने 1 जुलै रोजी कोरोनाची चाचणी केली होती. परंतु जो र्पयत अहवाल येत नाही, तो र्पयत उपचार करता येणार नाहीत, असे त्याला सांगण्यात आले होते. याच कालावधीत शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे, त्याच्या नातेवाईंकानी आधी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरु केली. अहवाल आला असेल तरच अॅम्ब्युलेन्स दिली जाईल असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अखेर एका रिक्षावाल्याला विनंती केल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी धडपड सुरु झाली.
जवळ जवळ दोन तास शहरातील प्रतीथयश तीन ते चार रुग्णालयात त्याला दाखल करुन घेण्यासाठी नातेवाईकांनी विनंती केली. परंतु आधी कोरोनाचा अहवाल आणा मगच दाखल करु असे त्यांना सांगण्यात आले. अखेर त्यांनी रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. परंतु रुग्णालयात जाईपर्यंतच रुग्णाचा रिक्षातच तडफडून मृत्यु झाला. डॉक्टरांनी तपासले असता, त्याचा आधीच मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.
चार दिवसानंतरही कोरोनाचा अहवाल प्राप्त नाही
सदर रुग्णाने 1 जुलै रोजी कळवा रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर चार दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आणि त्याचा मृत्यु झाल्यानंतरही अहवाल मात्र प्राप्त झालेला नाही. यामध्ये आता हा प्रशासनाचासुध्दा ढिसाळपणाच म्हणावा लागणार आहे.
रुग्णाच्या नातेवाईंकानाच मृतदेह प्लास्टीकमध्ये पॅक करावा लागला. सिव्हील रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला होता. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना 600 रुपये खर्च करुन प्लास्टीक रॅपर विकत घ्यावे लागले आणि तेथील कर्मचा:यांनी तुम्हालाचा मृतेदह पॅक करावा लागेल असे सांगितले. त्यानुसार नातेवाईकांमधील दोघांनी त्यांचा मृतदेह प्लास्टीकमध्ये पॅक केला.
अंत्यविधीसाठी लागले सहा तास ताटकळत
जवाहरबाग स्मशानभुमीतही अंत्यविधी करण्यासाठी जवळ जवळ सहा तासांचा कालावधी गेला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर जवाहरबाग स्मशानभुमीत नेण्यात आला. परंतु तेथे आधीच वेटींगवर 10 नंबर होते. त्यामुळे तेथे देखील त्यांना जवळ जवळ 6 तास ताटकळत उभे राहावे लागले होते. मागील कित्येक दिवसापासून इतर स्मशानभुमीतही ही व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्यापही त्याकडे प्रशासनाने काही लक्ष दिलेले नाही.