रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के, उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:45 AM2020-08-03T00:45:21+5:302020-08-03T00:45:58+5:30
आयुक्तांच्या प्रयत्नांना यश : उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी
उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर, मृत्युदर हा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
उल्हासनगरमध्ये लॉकडाऊनकाळात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन ती संख्या सहा हजार ८०० पेक्षा जास्त झाली. त्याचा आरोग्य सुविधेवर ताण पडला. महापालिकेच्या आरोग्य विभागाला नागरिकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यावर केबिन आयुक्त असल्याचा आरोप झाला. मात्र, आयुक्तांनी सर्वपक्षीय नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना विश्वासात घेऊन विविध उपाययोजना राबवत एक आराखडा तयार केला. अखेर, आयुक्तांच्या प्रयत्नांना यश येऊन पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येला ब्रेक लागला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांपेक्षा जास्त झाले. तसेच शहरातील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला.
एकूण रुग्णांपैकी पाच हजार ५४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, आजपर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला. एक हजार १५७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त ८० रुग्णांना तीव्र स्वरूपाचा त्रास होत आहे. तर, २६५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून २४७ रुग्णांना कोणताही त्रास व लक्षणे नाहीत. नागरिक घराबाहेर कमी पडल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होईल, अशी प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली.
कोरोना रुग्णांच्या जेवणाकडे लक्ष
कोरोना रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी महापालिका प्रशासन रुग्णांच्या जेवणाकडे विशेष लक्ष देत असल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. दोन वेळा गरम चहा, नाश्ता, जेवण, एक वेळ अंडे, फळे, दूध असे जेवण दिले जात आहे. सकस आहार दिला जात असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.