भाईंदरपाड्यातील रुग्णांना रोज मिळतेय सकस जेवण; १२०० जण घेत आहेत आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:22 AM2020-07-25T00:22:12+5:302020-07-25T00:22:20+5:30
जिल्ह्यातील पहिले कम्युनिटी किचन
- जितेंद्र कालेकर
ठाणे : ठाणे महापालिकेने कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी भार्इंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटरजवळच एका कम्युनिटी किचनला परवानगी दिली असून याच किचनमधून गरमागरम सकस जेवण रुग्णांच्या पलंगांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते. सुमारे १२०० रुग्ण या थाळीचा आस्वाद घेत आहेत.
कोरोना रुग्णांना काही ठिकाणी बेचव, खराब, जेवण दिल्याच्या तसेच जेवणात अळ्या सापडल्याच्या तक्रारी असल्या, तरी ठाण्यातील भार्इंदरपाडा येथील क्वारंटाइन सेंटर मात्र त्याला अपवाद ठरले. लोढाच्या येथील तीन इमारतींमध्ये सध्या ठाणे महापालिकेने हे सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी १२०० रुग्ण असून यामध्ये हाय रिस्क, लो रिस्क आणि कोरोनाग्रस्त अशा तीन प्रकारच्या रुग्णांची व त्यांच्या नातलगांची उपचाराची व विलगीकरणाची सोय केली आहे. एमएमआरडीएच्या तीनपैकी दोन इमारतींमध्ये हाय रिस्क, लो रिस्क रुग्ण, तर तिसऱ्या इमारतीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा समावेश आहे.
या रुग्णांची सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कसलीही आबाळ व्हायला नको म्हणून खासगी ठेकेदारामार्फत जेवण पुरविले जाते. संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच याठिकाणी प्रथिनेयुक्त सकस आणि गरमागरम आहार देण्यावर भर असतो. यासाठी अगदी पहाटे ४ वाजल्यापासूनच ३० ते ३५ स्वयंपाक्यांची लगबग सुरू होते. इथल्याच एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये हे किचन सुरू आहे. अनेक ठिकाणच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बाहेरून जेवण मागविले जाते.
पण, या ठिकाणी सेंटरमध्येच हे जेवण बनवून रुग्णांपर्यंत पोहोचवले जात असल्याचे सांगण्यात आले.
कसा असतो आहार
च्सकाळी उपमा, पोहे, मेदुवडे यापैकी एक पदार्थ न्याहारीत दिला जातो. सकाळी ७.३० ते ८ पर्यंत सर्वांना चहा-नाश्ता पुरविला जातो. पीपीई किट घालून स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेऊन येथील कर्मचारी हे काम करतात.
च्दु
पारच्या जेवणाची तयारी ही ११.३० ते १२ वाजल्यापासून सुरू होते. साधारण १ ते १.३० पर्यंत रुग्णांना जेवण पुरविले जाते. या जेवणामध्ये डाळभात, भाजी, चार चपात्या आणि खीर, मूगहलवा, शिरा किंवा बुंदी यापैकी एक गोड पदार्थ (तोंडाला चव येण्यासाठी) दिला जातो.
सायंकाळी चहा किंवा लहान मुलांचा विचार करून दूध, बिस्कीट पुरविले जाते.
रात्रीच्या जेवणामध्येही चपात्या, कडधान्ये आणि भाजीचा समावेश असतो.
अनुभवी शेफच्या मदतीने जेवण बनविले जाते. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे तापमान आणि आॅक्सिजनपातळी रोज तपासली जाते, असेही संजय पाटील यांनी सांगितले.‘रुग्णांना वेळेवर रुचकर, सकस जेवण मिळण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे अनुभवी कॅटरर्सना जेवणाचा ठेका दिला आहे. भार्इंदरपाड्याप्रमाणेच बाळकुमचे ग्लोबल हॉस्पिटल, होरायझन सेंटर याठिकाणीही रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरविण्याकडे पालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाते.’
- अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महापालिका