रुग्णांना मिळाला पीएनआर नंबर; प्रत्येकाची माहिती आता एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:47 AM2019-07-02T00:47:29+5:302019-07-02T00:47:37+5:30
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची माहिती आता येथील डॉक्टरांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची माहिती आता येथील डॉक्टरांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शिवाय, रुग्णांना आता केसपेपर काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरजही राहणार नाही. पालिकेने कळवा रुग्णालयाचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी उपचारासाठी आतापर्यंत आलेल्या तब्बल तीन लाख ३३ हजारांहून अधिक रुग्णांना आता पेशंट रिलेशन नंबर (पीएनआर) उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ज्यांची नोंदणी या माध्यमातून झाली आहे, त्या प्रत्येक रुग्णाची माहिती एका क्लिकवर डॉक्टरांना उपलब्ध झाली असून या रुग्णांवर उपचार करणे त्यामुळे सुलभ झाले आहे. विशेष म्हणजे रु ग्णांनी या नंबरशी आपला आधार नंबरदेखील लिंक केला असल्याने रुग्णांची ओळख पटवणे अधिक सोपे झाले आहे.
यापूर्वी केसपेपर काढण्यासाठी रुग्णाला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. त्यानंतर, त्या रुग्णावर उपचार करताना त्याला आधी कोणता आजार होता का, त्यावर काय उपचार केले आदी माहिती घेताना डॉक्टरांचा वेळ जात होता. परंतु, आता केवळ एका क्लिकवर, एका कार्डवर रुग्णाचा पूर्वेतिहास डॉक्टरांना उपलब्ध होणार आहे. कळवा रु ग्णालयाचा संपूर्ण कारभारच आता डिजिटल झाला असून सेवांचा विस्तारही हळूहळू केला जाणार आहे. केवळ रु ग्णालयाचा कारभारच डिजिटल होणार नसून हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाºया प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्डदेखील या प्रणालीच्या माध्यमातून ठेवले जाणार आहे. पालिकेने आणलेल्या हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम या नव्या प्रणालीमुळे या सर्व गोष्टी शक्य झाल्या असून या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १४ कोटी रुपये आहे.
कळवा रुग्णालयात शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयावर जेवढा उपचार करण्याचा ताण आहे, तेवढाच ताण रुग्णांची माहिती नोंदवणे, पेपरवर्क करणे, अशा स्वरूपाचा आहे. केसपेपर काढण्यासाठी रुग्णाचा किंवा त्याच्या नातेवाइकाचा एक ते दोन तासांचा वेळ जातो. त्यानंतर संबंधित विभागाच्या डॉक्टरकडे रुग्णाला पाठवल्यानंतर त्या डॉक्टरला रुग्णाचा पूर्वेतिहास विचारायला बराच वेळ लागत असल्याने यासाठी रुग्णाचे पाच ते सहा तास वाया जातात. आता पालिकेच्या नव्या प्रणालीमुळे या सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत. केवळ एका कार्डवर हॉस्पिटलमध्ये येणाºया
रु ग्णांची संपूर्ण माहिती आता उपलब्ध होत आहे. या प्रणालीमध्ये हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम, स्टुडंट लाइफसायकल मॅनेजमेंट सिस्टीम आणि पिक्चर अर्कायविंग अॅण्ड कम्युनिकेशन सिस्टीम या तीन गोष्टींवर संपूर्ण हॉस्पिटलचा कारभार चालणार आहे.
स्टुडंट लाइफसायकल मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून राजीव गांधी मेडिकलमध्ये शिक्षण घेणाºया सर्व विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. यामध्ये क्लासरूम, लॅबमधील उपस्थिती या सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेवणे शक्य होणार आहे.
रुग्णाची माहिती कुठूनही पाहता येईल
हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम ही वेबबेस आधारित प्रणाली असल्याने कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रु ग्णाची ही माहिती संबंधित डॉक्टरांना पाहता येणार आहे. रु ग्ण रक्ततपासणी किंवा एक्स रे काढण्यासाठी गेल्यानंतर त्याचे डिजिटल रेकॉर्ड लगेच डॉक्टरकडे उपलब्ध होतील.
पिक्चर अर्कायविंग अॅण्ड कम्युनिकेशन सिस्टीमद्वारे जलदगतीने रिपोर्टची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देवाणघेवाण करता येणार आहे. यासाठी हार्डकॉपी येण्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे रु ग्णांवर काय उपचार करावे, याचा अभ्यास डॉक्टरांना करता येणार आहे.