ठामपाच्या ‘ग्लोबल’ रुग्णालयात रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:01+5:302021-04-02T04:43:01+5:30
ठाणे : कोरोना रुग्णांसाठी असलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या साकेत येथील अतिरिक्त ग्लोबल रुग्णालयात सुविधांची वानवा असून, ...
ठाणे : कोरोना रुग्णांसाठी असलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या साकेत येथील अतिरिक्त ग्लोबल रुग्णालयात सुविधांची वानवा असून, ज्येष्ठ महिला रुग्णांशी तेथील कर्मचारी वर्ग अत्यंत मगरुरीने व बेफिकिरीने वागत असल्याचे बुधवारी निदर्शनास आले. वयोवृद्ध महिला रुग्णाची हेळसांड होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करताच एका परिचारिकेने काही महिला रुग्णांना उर्मट उत्तरे दिली.
याच रुग्णालयात दाखल असलेल्या काही महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी रुग्णाला दाखल करतानाही बराच अवधी लागतो. आधीच ताप, डोकेदुखी, घसादुखी या लक्षणांमुळे मेटाकुटीला आलेला रुग्ण दाखल होण्यास विलंब लागल्याने निराश होतो. रुग्णालयात पाऊल ठेवताच तेथील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाने आणखी हतबल होतो. दिवसभर रुग्णांचे मनोरंजन होईल, यासाठी या ठिकाणी काही दिवसांपूर्वी टीव्हीचे संच लावण्यात आले. मात्र, त्यात रिचार्ज नसल्याचे सांगण्यात येते. चौथ्या मजल्यावरील ४-बी ४ मध्ये पाच स्वच्छतागृहे आहेत. पैकी दोन ठिकाणीच गरम पाणी येते. यासंदर्भात परिचारिकांकडे तक्रारी करूनही फारसे लक्ष दिले जात नाही.
......................
वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष
याच वॉर्डातील ११६ क्रमांकाच्या बेडवरील एका वृद्धेची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती खालावली होती. तिने परिचारिकेला बोलावूनही ती तिथे फिरकली नाही. बुधवारी तिची प्रकृती आणखीनच खालावली. यातच तिने ऑक्सिजन काढून टाकला. त्या वेळीही परिचारिकेने तत्परतेेने धावून येण्याऐवजी अन्य कर्मचारी तिथे आला. या वृद्ध महिलेस अतिदक्षता विभागात हलविणे आवश्यक होते. मात्र, त्याची दखल घेतली जात नव्हती. तशाच अवस्थेत तिने खुर्चीवरच लघुशंका केली. इतर महिला रुग्णांनी वारंवार या वृद्धेला आयसीयूमध्ये हलविण्याचा तसेच तिचा डायपर बदलण्याचा आग्रह धरल्यानंतरही नर्सने उर्मट उत्तरे दिली. आदल्या दिवशी ती वृद्ध महिला बेडवरून खाली पडली. आजूबाजूच्या रुग्णांनी खूप आग्रह धरल्यानंतर या वृद्धेला अखेर आयसीयूमध्ये हलविण्यात आले.
* काही रुग्णांना पाच दिवसांनंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पण सहा ते सात दिवस होऊनही त्याबाबतही काहीच स्पष्टता नाही. ते कोणत्या ठिकाणी नेणार याची स्पष्टता नाही. काहीच स्पष्ट होत नसल्यामुळे एक महिला भावनाविवश झाल्याचे इतर रुग्ण महिलांनी सांगितले.
.........
वाचली.