ठाणे जिल्ह्यात वाढत आहेत म्युकरमोयकोसिसचे रुग्ण; २११ रुग्णांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 09:55 PM2021-06-03T21:55:32+5:302021-06-03T21:55:57+5:30
mucormycosis : गेल्या १५ दिवसांत रुग्णांच्या संख्येत वाढ
ठाणे : ठाणे जिल्ह्यात आतार्पयत म्युकरमोयकोसिस या आजाराचे रुग्ण दिवासगणिक झपाटय़ाने वाढू लागल्याचे दिसत आहे. मागील १५ दिवसात त्यात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आता या आजाराचे तब्बल २११ रुग्ण झाले असून त्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ५७ रुग्णांवर यशस्वी उपचार करुन ते त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणो दिसल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला आहे. त्यातही ठाणे शहरात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना उच्च मधुमेह आहे, अशांना या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले. परंतु आता ज्यांनी रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशांना देखील या आजाराची लागण होण्याच्या शक्यता नाकारता येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वेळीच या आजारावर योग्य ते उपचार घेणो हाच यावरील मार्ग असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनापाठोपाठ आता या आजाराने जिल्ह्यात वेगाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसात तर या आजाराचे रुग्ण वेगाने वाढतांना दिसू लागले आहेत. त्यानुसार आतार्पयत जिल्ह्यात २११ म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळून आले असून त्यातील 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यातील नऊ रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर यातील बहुसंख्य रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना दिसत आहेत.
तर यामध्ये सर्वाधिक ८५ रुग्ण हे ठाणो महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. तर त्या खालोखाल नवी मुंबईत ५३, कल्याणमध्ये ४४, उल्हासनगर ३, भिवंडी १, मिराभाईंदर २३, अंबरनाथ १, बदलापूर १ अशा पद्धतीने या रुग्णांची संख्या आहे. सुदैवाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आजाराचा रुग्ण अद्यापही आढळून आलेला नाही. तर रोजच्या रोज जिल्ह्यात सरासरी १० च्या आसपास नवे रुग्ण या आजाराचे सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर या आजाराच्या ठाण्यात ७, नवी मुंबईत ८ रुग्णांचा मृत्यु झाला असून कल्याणमध्ये १० आणि उल्हासनगरमधील एकाचा यात मृत्यू झाला आहे.