पाटील कुटुंबावर चढवला होता हल्ला, नातलगाने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:22 AM2020-03-03T01:22:26+5:302020-03-03T01:22:32+5:30
जमिनीच्या वादातून रविवारी रात्री चिमुरडी मुलगी आणि पत्नीसह स्वत:चेही जीवन संपवणाऱ्या वाकलन येथील शिवराम पाटील यांच्याशी नातलगांनी रविवारीदेखील वाद घातला होता.
कुमार बडदे
मुंब्रा : जमिनीच्या वादातून रविवारी रात्री चिमुरडी मुलगी आणि पत्नीसह स्वत:चेही जीवन संपवणाऱ्या वाकलन येथील शिवराम पाटील यांच्याशी नातलगांनी रविवारीदेखील वाद घातला होता. सायंकाळी काही जण पाटील कुटुंबीयांना मारण्यासाठी त्यांच्या घरावर चाल करून गेले होते. त्यामुळे प्रचंड मानसिक तणाव येऊन पाटील यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या नातलगांनी केला आहे.
मुंब्रानजीकच्या वाकलन येथील शिवराम पाटील आणि त्यांची पत्नी दीपिका यांनी मुलगी अनुष्का हिच्यासह रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. वारसा हक्काने मिळालेल्या वडिलोपार्जित जागेत घर बांधण्याचा पाटील यांचा विचार होता. परंतु, यास त्यांचे इतर भाऊ तसेच त्यांचे कुटुंबीय विरोध करत होते. यावरून मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. परंतु, प्रत्येकवेळी इतर आप्तस्वकीयांच्या मध्यस्थीने वाद मिटवला जात होता. रविवारी सकाळी आणि संध्याकाळीदेखील त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर संध्याकाळी काही जण पाटील कुटुंबाला मारण्यासाठी त्यांच्या घरावर चाल करून गेल्याची माहिती दीपिकाचे मोठे बंधू श्रीनाथ केणे यांनी दिली. या प्रकारामुळे पाटील कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली होते. यातून त्यांनी आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेतली असावी, अशी शक्यता त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
>पाटील कुटुंबाने केले मरणोपरान्त नेत्रदान : जमिनीच्या वादामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणारे शिवराम आणि दीपिका पाटील तसेच त्यांची मुलगी अनुष्काचे शवविच्छेदन कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात करण्यात आले. तिघांचे मरणोपरान्त नेत्रदान करण्यात आल्याची माहिती दीपिकाच्या भावाने दिली.