पाटलांना कचराकुंडीची समस्याही सुटेना !
By admin | Published: September 1, 2015 04:30 AM2015-09-01T04:30:20+5:302015-09-01T04:30:20+5:30
प्यायला पाणी आहे, पण चालायला धड रस्ते नाहीत, घर आहे पण स्वास्थ्य नाही. स्मशानभूमी आहे तर अंत्यसंस्कारांची सुविधा नाही, अशी बकाल स्थिती आहे जुन्या डोंबिवली
अनिकेत घमंडी, डोंबिवली
प्यायला पाणी आहे, पण चालायला धड रस्ते नाहीत, घर आहे पण स्वास्थ्य नाही. स्मशानभूमी आहे तर अंत्यसंस्कारांची सुविधा नाही, अशी बकाल स्थिती आहे जुन्या डोंबिवली या ७२ क्रमांकाच्या वॉर्डाची. याच वॉर्डातून माजी महापौर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर तीन टर्म रामदास पाटील निवडून आले आहेत. गल्लीबोळांतून रस्ता काढताना नागरिकांच्या नाकीनऊ आले असतानाच गेल्या २० वर्षांपासून असलेली कचराकुंडी हटता हटत नसल्याने पाटील यांच्यासह ठाकूरवाडीतील रहिवासी हैराण झाले आहेत. त्या ठिकाणी आजूबाजूच्या चार वॉर्डांचा कचरा येऊन पडत आहे. त्यासाठी परिसरातील शेकडो रहिवाशांनी नगरसेवकाला पत्रे दिली असून नागरिक विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष पेटला आहे.
अनेकांना दम्याचाही त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे वॉर्डात अन्यत्र आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसेवक सक्षम आहे तर तो का सुटला नाही, असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिक अविनाश भिंगार्डे यांनी केला. घाणामुळे तेथे मोकाट कुत्री येतात आणि ती सर्व कचरा अस्ताव्यस्त करतात. कचरा उचलणाऱ्या गाडीतून पडणारे घाण पाणी येथेच रस्त्यावर पडते. त्यामुळेही परिसरात दुर्गंधी आणि रोगराईचे वातावरण होते.
या ठिकाणच्या सुमारे १०-१२ भूखंडांवर आरक्षण आहे. त्यातील स्मशानभूमीच्या ठिकाणी ती बांधण्यात आली असून अन्य निधीअभावी तसेच पडून आहेत. स्मशानभूमीसह गणेशघाट अद्ययावत करण्यात आलेला नाही. पाच हजारांहून अधिक गणपतींचे या ठिकाणी विसर्जन होते. त्या वेळी भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेकडून काळजी घेण्यात येत असली तरीही रस्ते अरुंद असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची प्रचंड गैरसोय होते. विस्तीर्ण खाडीकिनारा असून तो संरक्षित नाही. चिंचोळ्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने केडीएमटीची बसही येथे येत नाही.