खड्ड्यांवरून पालिका प्रशासन धारेवर, कामाच्या दर्जाबाबत खंत : स्थायी समितीच्या सभापतींनी व्यक्त केली नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:00 AM2017-09-09T03:00:36+5:302017-09-09T03:00:40+5:30
कल्याण-डोंबिवली शहरांतील खड्ड्यांचे पडसाद शुक्रवारच्या केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. सर्व पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर प्रशासन अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले.
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील खड्ड्यांचे पडसाद शुक्रवारच्या केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभेतही उमटले. सर्व पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर प्रशासन अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. या वेळी सभापती रमेश म्हात्रे यांनीही रस्त्यांच्या कामात दर्जा योग्य प्रकारे राखला जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर, सोमवारपासून डांबरीकरणाची कामे सुरू केली जातील, असे स्पष्टीकरण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी दिले.
केडीएमसीच्या हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर चाळण झाली आहे. पावसाने उघडीप देऊनही केवळ खडीकरण केले जात असल्याने सध्या सर्वत्र धुळीचे वातावरण पसरले आहे. या खड्ड्यांबाबत शुक्रवारी ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. केडीएमसीच्या स्थायीच्या बैठकीतही खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भाजपाचे सदस्य विकास म्हात्रे यांनी खड्ड्यांच्या मुद्याकडे लक्ष वेधले. वर्षभर रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असतात, तरीही खड्डे का पडतात, असा सवाल त्यांनी केला. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, उत्सव संपला तरी खड्डे काही बुजवले नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. हे खड्डे नक्की बुजवणार आहात की नाही, अशीही विचारणा त्यांनी अधिकाºयांना केली. वर्षातून चार ते पाच वेळा खड्डे बुजवण्याची कामे केली जातात. परंतु, वारंवार खड्ड्यांचे चित्र पाहावयास मिळते. अशा प्रकारे निकृष्ट पद्धतीने काम करणाºया कंत्राटदारांची बिले रोखा. जोपर्यंत कामे योग्य प्रकारे होत नाही, तोपर्यंत त्यांना बिले अदा करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर रस्त्यांमधील खड्डे बुजवण्याची कामे केली जातात. परंतु, मे महिन्यातही ही कामे पूर्ण झालेली नव्हती. खड्डे बुजवण्याची कामे ठरावीक कंत्राटदारांनाच दिली जातात. निकृष्ट पद्धतीचे डांबर वापरले जाते. त्यात आॅइलिंगचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे कामांचा दर्जाही योग्य प्रकारे राखला जात नाही. अधिकाºयांकडून कामाचा दर्जा तपासलाही जात नाही, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. कामांच्या योग्यतेबाबत जोपर्यंत नगरसेवकांचे समाधान होत नाही, तोपर्यंत बिले अदा करू नका, असे आदेशही म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.