कल्याणमध्ये ५९ वाहनांद्वारे घातली जाते गस्त! चोरट्यांवर वचक ठेवण्यासाठी १७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गस्तीची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 09:00 AM2021-01-20T09:00:03+5:302021-01-20T09:01:31+5:30
प्रशांत माने कल्याण : कल्याण परिमंडळ-३ मध्ये काही महिन्यांपासून घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यरात्री ...
प्रशांत माने
कल्याण: कल्याण परिमंडळ-३ मध्ये काही महिन्यांपासून घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यरात्री चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य केली जात असताना दिवसाढवळ्याही घराचे कडी-कोयंडे उचकटून लाखोंची मालमत्ता लुटून नेली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चोरीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, असे असले तरी वाढत्या घटना पाहता पोलिसांची गस्त सुरू आहे का?, अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत ५९ वाहनांद्वारे गस्त घातली जात असून, गस्तीसाठी १७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे पोलिसांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीत घरे व दुकानांचे शटर उचकटून मुद्देमाल लंपास करणे, चोरी, दरोडा, सोनसाखळी चोरी अशा घटनांत वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये एका जवाहिऱ्याच्या दुकानात भरदिवसा शस्त्राच्या धाकाने चोरीचा प्रकार घडला होता. तर, आडीवलीत तीन दिवसांत ११ घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे गस्तीवरच संशय व्यक्त झाला. लॉकडाऊनमध्ये गस्त मोठ्या प्रमाणात होती. त्यावेळी गुन्हे घटले होते. परंतु, आता गुन्ह्यांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
वाहनांवर असे ठेवले जाते नियंत्रण
कल्याण परिमंडळ-३ मध्ये कल्याण, डोंबिवलीतील प्रत्येकी चार पोलीस ठाणी आहेत. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरिक्षकांसह दोन्ही शहरांतील सहायक पोलीस आयुक्त आणि परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांतर्फेही गस्त घातली जात आहे. आरएफआयडी प्रणालीद्वारे गस्त घातल्याची नोंद केली जात आहे. कल्याण परिक्षेत्रात अशी २६ यंत्र लावली आहेत. तसेच दर दोन तासांनी गस्त घातली जाते.
अनलॉकमध्ये गस्त झाली कमी
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलिसांची दिवस-रात्र गस्त दिसून येत होती. परंतु, अनलॉक सुरू झाल्यापासून गस्त कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनलॉकमध्ये एका ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन संबंधित यंत्रणांकडून केले जात असताना दुसरीकडे मात्र या नियमाकडे पुरते दुर्लक्ष केले जात आहे. गस्त कमी झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जाते. कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख चौकांमध्ये हे चित्र दिसून येते.
अशी होते गस्तीची नोंद
‘आरएफआयडी’च्या २७ मशीनपैकी पाच मशीन महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडीत प्रत्येकी तीन, खडकपाडा चार, रामनगर आणि विष्णूनगर, टिळकनगर प्रत्येकी तीन आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मशीन लावली असून एकूण ७८६ टॅग आहेत. या माध्यमातून गस्ती घातल्याची नोंद होते.
चोरीचे प्रमाण घटले
कल्याण परिमंडळ हद्दीत दररोज गस्त घातली जाते. गस्त परिणामकारक होतेय की नाही, यासाठी आरएफआयडी प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवले जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चोरीचे प्रमाण कमी झाले आहे.
- विवेक पानसरे,
पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३