निराधारांच्या अन्नदाता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:25 AM2018-10-15T00:25:52+5:302018-10-15T00:26:23+5:30
- प्रज्ञा म्हात्रे अनाथांना आधार देत, भुकेल्यांचे पोट भरत त्यांना जगण्याचे बळ देण्याचे सेवाभावी काम अनेक संस्था करतात. ...
- प्रज्ञा म्हात्रे
अनाथांना आधार देत, भुकेल्यांचे पोट भरत त्यांना जगण्याचे बळ देण्याचे सेवाभावी काम अनेक संस्था करतात. पण या संस्थांनाही पोट असतेच की! सरकार, दानशूर व्यक्तींचा मदतीचा हात नसेल तर या संस्था निराधारांचे पोट भरणार कशा? त्यांना मदत करणे ही तर प्रत्येकाचीच सामाजिक बांधिलकी. याच बांधिलकीच्या सदभावनेतून धान्यपेढीची संकल्पना राबवत ठाण्यातील उज्ज्वला बागवाडे निराधारांच्या अन्नदाता झाल्या. बीड जिल्ह्यातील सेवाश्रम, शांतिवन आणि श्रद्धा फाउंडेशन या संस्था त्यांनी दत्तक घेतल्या.
गरजूंना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या उज्ज्वला बागवाडे यांनी मासिकात शांतिवन, श्रद्धा फाउंडेशन या संस्थांच्या कार्याचा लेख वाचला आणि त्या भारावल्या. लागलीच बीड जिल्ह्यातील शांतिवन संस्थेत गेल्या. तेथील काम पाहून प्रभावित झाल्या. परंतु निधीअभावी रखडलेली कामे पाहून त्यांना खंत वाटली.
दरम्यान, वॉकला जाताना त्यांना मनोरुग्ण मुलगी दिसली. तिला योग्य उपचार, मायेचा आधार मिळावा, यासाठी त्यांनी श्रद्धा फाउंडेशनमध्ये दाखल केले. दोन महिन्यांनी ती बरी झाल्याचा फोन आला. तिला भेटायला गेल्या. तिने त्यांच्याकडे बिस्किट मागितले. त्या क्षणी त्यांना जाणीव झाली की, पोटासाठी अनेक जण इतरांकडे हात पसरतात. मात्र याच हातांना आधार देत नव्याने उभे राहण्याचे बळ अशा संस्था करीत आहेत. म्हणूनच अशा संस्थांच्या हातांना बळ लाभायला हवे असे त्यांना वाटू लागले.
दुसºया दिवशी त्यांनी परिचयाच्या १२ गृहिणींना घरी बोलावले. शांतिवनची परिस्थिती सांगितली. निधी नसेल तर संस्थेतील निराधारांचे पोट कसे भरणार? हे लक्षात घेऊन त्यांनी धान्य द्यायचे ठरविले. प्रत्येकीने कमीतकमी एक किलो परवडणारे धान्य देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तीन महिन्यांनी एकदा धान्य द्यायचे ठरले. परंतु तेही पुरे पडणारे नव्हते. दाते वाढावेत म्हणून प्रत्येकीला दहा माणसे जोडायला सांगितले. यातून हळूहळू दात्यांची साखळी तयार झाली. ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले’ या उक्तीप्रमाणे गेल्या पाच-सहा वर्षांत साखळी वाढली असून या धान्यपेढीशी चारशेहून अधिक सदस्य जोडले गेले आहेत. दरम्यान, त्यांनी ‘वुई टुगेदर’ या महिला गटाचीही स्थापना केली. नवरा, मुलगी यांच्या पाठिंब्यामुळेच हे काम करू शकत आहे, असे त्यांनी सांगितले. आता इतर काही संस्थाही दत्तक घेण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. सर्वांच्या पोटाला अन्न मिळावे यासाठीची त्यांची धडपड अविरत सुरू आहे.