‘पॉज’ने वाचविले तब्बल ३,४७७ वन्यजीवांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:07 AM2020-10-04T00:07:53+5:302020-10-04T00:07:58+5:30

२० वर्षांतील कामगिरी; वन्यजीव टिकले तर, अन्नसाखळी राहील

Pause saves 3,477 wildlife lives | ‘पॉज’ने वाचविले तब्बल ३,४७७ वन्यजीवांचे प्राण

‘पॉज’ने वाचविले तब्बल ३,४७७ वन्यजीवांचे प्राण

Next

कल्याण : प्राणी व पक्ष्यांसाठीच्या प्लॅण्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीने (पॉज) २० वर्षांत तीन हजार ४७७ वन्यजीवांचे प्राण वाचविले आहेत. वन्यजीव टिकले तर अन्नसाखळी अबाधित राहील, याकडे संस्थेचे प्रमुख निलेश भणगे यांनी लक्ष वेधले आहे.

२ ते ९ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर भणगे म्हणाले, कुठे विहिरीत मांजर पडले, घोरपड आढळली, पक्ष्याच्या गळ्यात मांजा अडकला किंवा मोर जखमी झाल्यास संस्थेकडे फोन येतात. मग, आम्ही घटनास्थळी पोहोचून त्यांना वाचवतो. २० वर्षांत एक हजार ६१ साप, दोन हजार २६७ पक्षी, १३ माकडे, तीन कोल्हे, ६० कासव, ३१ विविध प्रजातींमधील सरपटणारे प्राणी, ज्यात घोरपड, सरडे, २० खारुताई, वटवाघूळ, विंचू अशा तीन हजार ४७७ प्राण्यांची सुटका केली आहे. जखमींवर उपचारही केले आहेत.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातून सर्वात जास्त पक्षी ‘पॉज’कडे पुनर्वसनासाठी येतात. फ्लेमिंगो, चातक, तीनबोटी खंड्या असे स्थलांतरित व दुर्मीळ पक्ष्यांचेही संस्थेने पुनर्वसन केले आहे. विविध बदके, बगळे, सागरी ससाणे, कावळे, चिमण्या, कबुतर, मैना, घार, कोकिळा तसेच लवबर्ड, टर्की आफ्रिकन पोपट यांचेही प्राण वाचवले आहेत. पक्ष्यांच्या लहान पिलांना पुनर्वसन उपक्रमात तात्पुरते पालक दिले जातात. संस्थेच्या सदस्य शिल्पा हरकरे या पक्ष्यांना जेवण भरवितात. पकडलेले सर्प पुन्हा निसर्गात सोडले जातात.

दरम्यान, जखमी प्राण्यांवर संस्थेच्या मुरबाड येथील रुग्णालयात उपचार केले जातात. तसेच ‘पॉज’कडे बरीच साधने असून, ती स्कॉटलॅण्ड, इंग्लंड, अमेरिका येथून आयात केली आहेत. संस्थेने सर्पमित्रांची सभा, सर्प संमेलन घेऊन सर्पविषयक माहिती संकलित केली आहे.

थायलंडमधील पक्षिगणनेत सहभाग
संस्थेकडे ४० छायाचित्रकारांनी टिपलेल्या वन्यजीव व निसर्गाच्या ३०० छायाचित्रांचा संग्रह आहे. भणगे यांनी स्वत: अंदमान निकोबार ते नेपाळ, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, हाँगकाँग येथे छायाचित्रण केले आहे. थायलंडमधील पक्षिगणनेतही त्यांनी सहभाग घेतला आहे.

हत्तींसंदर्भात अहवाल सादर
भणगे यांनी २००५ पासून पाळीव हत्तींवर संशोधन केले आहे. महाराष्ट्र व गोव्यातील पाळीव हत्तींचा अभ्यास करून न्यायालयात अहवाल सादर केला आहे. तसेच सर्कशीतील १२ सिंह, दोन वाघांची सुटका करून आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने त्यांना बाणोर घाटात सोडले आहे.

Web Title: Pause saves 3,477 wildlife lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.