शिक्षक वेतनाचा प्रश्न पवारांकडे
By admin | Published: June 22, 2017 12:05 AM2017-06-22T00:05:33+5:302017-06-22T00:05:33+5:30
जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेऐवजी १ जुलैपासून ठाणे जनता सहकारी बँकेतून करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेऐवजी १ जुलैपासून ठाणे जनता सहकारी बँकेतून करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आता स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीच पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आणून बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत:च राज्य शासनाला जाब विचारणार आहेत.
केवळ ठाणे जिल्ह्यासाठी आदेश काढून टीडीसीसी बँकेतील शिक्षकांचे वेतन टीजेएसबीत वळवण्याचे कारण काय, अशी विचारणा करण्यासाठी शरद पवार
यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी केला. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री मातोश्रीवर गेले असल्यामुळे पवारांचे त्वरित बोलणे झाले नाही. पण, काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांशी बोलतो, असे आश्वासन पवारांनी दिल्याचे टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे यांनी लोकमतला सांगितले. आमदार पांडुरंग बरोरा यांनी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह पवार यांच्याकडे धाव घेऊन या अन्यायकारी निर्णयाविरोधात तक्रार केली आहे.
महिनाकाठी सुमारे ७० कोटींपेक्षा जास्त रक्कम शिक्षकांच्या वेतनावर वाटप करणाऱ्या टीडीसीसी बँकेला शिक्षकांचे खाते सहजासहजी टीजेएसबीत वर्ग करायचे नाही. तसे झाल्यास वर्षानुवर्षे या मोठ्या बिझनेसचा तोटा लवकर भरून काढता येणार नाही, याची जाण ठेवून टीडीसीसीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे आदींनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला असल्याचे सांगण्यात आले.