दिल्लीतील परिवर्तनाची सूत्रे पवारांच्याच हातात असतील, संजय राऊत यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:16 AM2020-01-28T05:16:58+5:302020-01-28T05:20:01+5:30
'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते, तर हे सरकार आले नसते.'
ठाणे : ज्यावेळी शरद पवार यांना ईडीची नोटीस आली, तेव्हाच महाराष्ट्रात बदलाची भावना निर्माण झाली. पवार यांच्यासारख्या नेत्याला ईडीची नोटीस येऊ शकते, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय होईल, राज्यात परिवर्तन करून पवारांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना यामधून बाहेर काढले. महाराष्ट्रात झालेले हे परिवर्तन दिल्लीपर्यंत जाईल आणि याची सूत्रे त्यांच्याच हातात राहतील, असे रोखठोक मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते, तर हे सरकार आले नसते. मात्र, पवार यांनी ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर, ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, हे सांगायलादेखील राऊत विसरले नाहीत.
खारेगाव येथील ९० फूट रोडवर आयोजित केलेल्या ठाणे फेस्टिव्हलमध्ये कळवा, विटावा, पारसिकनगर, खारीगाव येथील नागरिकांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवर्जून उपस्थित राहून जितेंद्र आव्हाड आणि त्यांची पत्नी ऋता यांचा सत्कार केला. खासदार संजय राऊत,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
राऊत पुढे म्हणाले, शरद पवार हेच महाविकास आघाडीचे उद्गाते आहेत. ते सर्वांना भावनिक होऊन जाऊ नका, असे सांगतात. मात्र, आयुष्य हे भावनेवरच चालले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या खाली भावनांचा उद्रेक झाला नसता, तर महाविकास आघाडीचे सरकारच स्थापन झाले नसते. त्यामुळे हे सरकार भावनेच्या उद्रेकातून निर्माण झाल्याचे राऊत म्हणाले. आज महाविकास आघाडीतील जे तीन पक्ष आहेत, त्यांची तोंडे तीन वेगवेगळ्या दिशांना होती. पण, आम्ही गेल्या पाच वर्षांत खूप भोगले होते. आता पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाहेर पडलो आहोत. महाराष्ट्रातील या परिवर्तनाची नांदी देशभर होणार असून दिल्लीतील परिवर्तनाची सूत्रेही पवार यांच्याच हाती असणार आहेत. त्यांचे आदेश ऐकून ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. महाविकास आघाडीमुळे ठाण्याला दोन मंत्री मिळाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या कामांसाठी स्थापन झाले आहे. लोकांचे फोन टॅप करायला नाही, असा टोलाही त्यांनी आधीच्या सरकारला लगावला.
...तर आव्हाड शिवसेनेतून मंत्री झाले असते
जर जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या प्रेमात पडले नसते, तर ते शिवसेनेकडून मंत्री झाले असते, असे वक्तव्य करून संजय राऊत यांनी उपस्थितांमध्ये खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांची पवारांवर संपूर्णपणे निष्ठा असून निष्ठा काय असते, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असे राऊत यांनी सांगितले. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडवले आहे. ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे दोन मंत्री मिळाले असून त्यांनी आपल्या मतदारसंघांच्या विकासासोबत आता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.