बुलेट ट्रेनप्रमाणेच भरपाई द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:18 AM2019-12-25T00:18:43+5:302019-12-25T00:19:08+5:30
विरार-अलिबाग कॉरिडॉर : युवा मोर्चाचा असहकार्याचा इशारा
कल्याण : विरार-अलिबाग कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्यांना बुलेट ट्रेनसाठी संपादित केल्या जाणाºया जमिनीला दिला जातो तेवढाच मोबदला देण्याच्या मागणीसह अन्य मागण्या पूर्ण करा. अन्यथा प्रकल्पास सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चाने दिला आहे.
युवा मोर्चाचे गजानन पाटील यांच्या शिष्टमंडळाने मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतून विरार-अलिबाग कॉरिडॉर जातो. अलिबाग, पनवेल, पेण, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, पालघर, वसईतील शेतकºयांच्या जमिनी यात बाधित होत आहेत. जमिनीचा दर कमी दिला जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात जो दर दिला गेला तोच दर या प्रकल्पबाधितांना मिळणे अपेक्षित आहे. प्रकल्पानजीकच्या बाधितांना बांधकाम करायचे झाल्यास शून्य समास अंतर सोडून त्यास ना हरकत दाखला मिळाला पाहिजे. विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे बांधकाम करण्यास ना हरकत दाखल्यासाठी शुल्क आकारले जाऊ नये. घराच्या बदल्यात घर दिले जावे. जमिनीच्या बदल्याच जमीन दिली जावी. प्रकल्पापासून सर्व्हिस रोडची सुविधाही असायला हवी. तसेच बाधित आणि स्थानिकांना हा रस्ता टोलफ्री असावा. घारिवली, संदप, काटई आणि कोळे गावातील पूर्वीचे नकाशे व सातबारा नंबर यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची घरे बाधित होत आहे. ही घरे बाधित होऊ नये यासाठी केलेला बदल रद्द करण्यात यावा. पुन्हा नव्याने नकाशे व सातबारा याचा फेरविचार करण्याची गरज आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण कमी होऊ शकते. विरार अलिबाग कॉरीडॉर प्रकल्पास संत सावळाराम महाराज यांचे नाव दिले जावे, अशी मागणीही युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
‘तो’ मोबदला मार्गी लावा
च्भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरणातील बाधितांना मोबदला आधी देण्यात यावा यासाठी एमएसआरडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे.
च्मोबदला न मिळाल्यास कॉरिडॉरला गावांतील बाधित सहकार्य करणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.