झाडांच्या लागवडीसाठी २० कोटी भरा; मीरा-भाईंदर महापालिकेचं MMRDA ला पत्र
By धीरज परब | Updated: March 21, 2025 23:33 IST2025-03-21T23:33:41+5:302025-03-21T23:33:59+5:30
मेट्रो कारशेडचे आरक्षण मुर्धा - राई गावा मागील मोकळ्या जमिनीवर टाकल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी कारशेडला विरोध चालवला होता.

झाडांच्या लागवडीसाठी २० कोटी भरा; मीरा-भाईंदर महापालिकेचं MMRDA ला पत्र
धीरज परब
मीरारोड- भाईंदर येथील मेट्रो कारशेडच्या पहिल्या टप्प्यातील १ हजार ४०६ बाधित झाडांच्या बदल्यात ८ हजार २९२ झाडे लावण्यासाठी महापालिके कडे २० कोटी ७७ लाख २१ हजार ८०० रुपये इतका वृक्षनिधी आधी जमा करावा असे पत्र मीरा भाईंदर महापालिकेने एमएमआरडीएला दिले आहे.
भाईंदरच्या पश्चिमेच्या तोदि वाडी येथे मेट्रोचे सुभाषचंद्र बोस मैदान स्थानक येणार आहे. लगतच्या परिसरात खाजगी विकासक व राधास्वामी संस्थेची मुबलक मोकळी जागा असताना मेट्रो कारशेडचे आरक्षण मुर्धा - राई गावा मागील मोकळ्या जमिनीवर टाकल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी कारशेडला विरोध चालवला होता. त्या विरोधा मुळे मेट्रो कारशेडचे आरक्षण रद्द करून डोंगरी येथील डोंगरावर टाकले गेले.
स्थानिक ग्रामस्थांनी कारशेडला सुरवातीला विरोध केला नाही. पहिल्या टप्प्यात डोंगरावर कारशेड साठी सरकारी आणि खाजगी जागेतील १ हजार ४०६ झाडे काढण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने मंजुर केला. मात्र त्यावेळी काही नागरिकांच्या हरकतीच्या अनुषंगाने पालिका उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी एमएमआरडीएला १५ जानेवारी रोजी पत्र देऊन पुनर्रोपण केली जाणारी ५७४ झाडे तर नव्याने लावावी लागणारी ८ हजार २९२ झाडे कुठे लावणार ? त्याचा आराखडा सादर करण्यास सांगितले.
एमएमआरडीएने झाडे लावण्याबद्दलचा आराखडा सादर केला नाही. महापालिकेच्या ठरावा नुसार झाड लावण्यास जागा नसेल तर प्रतिझाड २५ हजार रुपये इतका वृक्ष निधी घेण्याचा, पुनर्रोपण साठी १० हजार रुपये प्रति झाड अनामत रक्कम घेणे व पाहणी शुल्क प्रतिझाड ३०० रुपये आकारणे असा ठराव आहे.
ठरावाच्या अनुषंगाने १९ मार्च रोजी उपायुक्त पिंपळे यांनी एमएमआरडीएला पत्र देऊन झाडांची लागवड व देखभाल करण्यासाठी एमएमआरडीए कडे जागा नसल्याने वृक्षनिधी म्हणून ८ हजार २९२ झाडांचे प्रतिझाड २५ हजार रुपये प्रमाणे २० कोटी ७३ लाख रुपये तर मूळ १ हजार ४०६ झाडांची पाहणी शुल्क म्हणून ४ लाख २१ हजार ८०० रुपये असे एकूण २० कोटी ७७ लाख २१ हजार ८० रुपये इतकी रक्कम महापालिकेकडे जमा करण्यास सांगितले आहे. सदर रक्कम पालिका फंदात जमा केल्या नंतर त्यांची पावती सादर केल्यावर ८३२ झाडे मुळासहित तर ५७४ झाडे पुनर्रोपणची कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान दुसऱ्या टप्प्यात ९ हजार ९०० झाडे काढली जाणार असल्याने त्या विरोधात मोठ्या संख्येने महापालिके कडे हरकती आल्या आहेत. सदर झाडांच्या अनुषंगाने वृक्षनिधिची रक्कम ८० ते १०० कोटीं पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे.