२८ फेब्रुवारीपर्यत कर भरा अन् १०० टक्के सूट मिळवा; करदात्यांचाही उत्तम प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 12:18 PM2021-01-30T12:18:35+5:302021-01-30T12:18:44+5:30
ठाणे महापालिकेचा निर्णय
ठाणे: ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षात जे निवासी करदाते आपला थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित जमा करतील त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर १०० टक्के सवलतीची योजना १ ते ३१ जानेवारी या कालावधीत सुरू केली होती, या कालावधीत करदात्यांचा मिळालेला उत्सफूर्त प्रतिसाद विचारात घेवून या योजनेस २८ फेब्रुवारी २०२१ पर्यत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी घेतला आहे.
करदात्यांसाठी ही योजना १ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीकरिता कार्यान्वित असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कराची थकबाकी असल्यास संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सूट नंतरची देय शास्ती (दंड / व्याज) ची रक्कम उपरोक्त मुदतीमध्ये एकत्रित जमा करणे अनिवार्य आहे. ज्या करदात्याने मालमत्ता कराची व पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम शास्तीसह या योजनेपूर्ण जमा केली असेल त्यांना ही सूट देय असणार नाही.
प्रस्तुत शास्ती (दंड/ व्याज) माफीच्या योजनेतंर्गत काही विवाद/ आक्षेप उत्पन्न झाल्यास त्याबाबत महापालिका आयुक्त यांचे निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. १ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यत कर जमा करुन योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांना महापालिकेच्या अटी मान्य आहेत, असे समजण्यात येईल, त्या संदर्भात कोणताही आक्षेप करदात्यांना घेता येणार नाही.
असे भरता येईल देयके
ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरणेकरिता देयके महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे करदाते, नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोईचे व्हावे याकरिता ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभाग स्तरावील कर संकलन केंद्र तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रामधील कर संकलन केंद्र २८ फेब्रुवारी 2021 पर्यत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायं. ५ तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार या दिवशी सकाळी १०.३० ते सायं. ४ या वेळेत सुरू राहतील. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या DigiThane या ॲपद्वारे मालमत्ता कराचा भरणा केल्यास या DigiThane ॲपद्वारे मिळणारी सूटही मिळू शकेल. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठामपाने केले आहे.