‘साहेबां’च्या स्मृतिदिनी बालेकिल्ल्यात शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:16 AM2017-11-18T01:16:58+5:302017-11-18T01:17:15+5:30
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे शहराचे नाते तसे अतूट आहे. शिवसेनेला पहिली सत्ता या शहराने दिली. यामुळे ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशा शब्दांत ठाण्यातील शिवसैनिक सार्थ अभिमान व्यक्त करतात.
ठाणे : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे शहराचे नाते तसे अतूट आहे. शिवसेनेला पहिली सत्ता या शहराने दिली. यामुळे ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशा शब्दांत ठाण्यातील शिवसैनिक सार्थ अभिमान व्यक्त करतात. मात्र, बाळासाहेबांच्या पाचव्या स्मृतिदिनी शहरातील काही मोजके चौक वगळता त्यांना अभिवादन करणारी होर्डिंग्ज, बॅनर्स शहरात कुठेच दिसले नाहीत आणि कार्यक्रमांचाही गाजावाजा झाला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्रमुख चौक, वाहतूक जंक्शनसह प्रमुख होर्डिंग्जची ठिकाणे अतिक्रमणांनी व्यापली म्हणून की काय किंवा फेरीवाल्यांचा समाचार घेण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या उद्या (शनिवार) च्या सभेची ‘सर्व प्रश्नांचे एकच उत्तर मनसे,’ अशी गर्जना करणारी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लागल्याने शिवसेनेला बाळासाहेबांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याकरिता ठाण्यात जागाच उपलब्ध झाली नाही की काय, असा सवाल केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी व स्मृतिदिनी ठाणेकर शिवसैनिकांकडून दरवर्षी ठिकठिकाणी होर्डिंग्ज व पोस्टर्स लावली जातात. चौकाचौकांत आकर्षक भावमुद्रा असलेली आकर्षक होर्डिंग्ज दिसतात. विविध कार्यक्रम आयोजिले जातात. मात्र, यंदा ना होर्डिंग्ज दिसली ना वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे जाणवले. ठाणे महापालिकेवर पहिल्यांदाच शिवसेनेची स्वबळावर सत्ता आली आहे. त्यामुळे यंदा ठाण्यात बाळासाहेबांचा स्मृती दिन विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा होईल, अशी ठाणेकर शिवसैनिकांची अपेक्षा होती. महापालिकेतील सर्व नगरसेवक, शहरातील तीन आमदार, खासदार, पालकमंत्री, अशा रथीमहारथींचे पाठबळ त्याला मिळेल, अशी भावना होती. परंतु, महापालिका मुख्यालयात बाळासाहेबांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून केलेल्या अभिवादनाशिवाय शहरात कोणतेही कार्यक्रम केले नाहीत.