दहीहंडीच्या नगरीत शांतता; कोरोनामुळे शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:58 AM2020-08-13T00:58:05+5:302020-08-13T00:58:19+5:30
ना ढाक्कुमाकूमचा ताल दिसला, ना डीजेचा दणदणाट
ठाणे : दहीहंडीची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात बुधवारी या उत्सवानिमित्त शुकशुकाट दिसून आला. कोरोनाच्या सावटामुळे जिल्ह्यात ना ढाक्कुमाकूमचा ताल दिसला, ना डीजेचा दणदणाट. मंगळवारी रात्री सर्वत्र पारंपरिक पद्धतीने जन्माष्टमी साजरी करण्यात आली. बुधवारी पारंपरिक दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याने सर्वत्र शांतता दिसून आली. यामुळे कोसळणाºया पाऊसधारांचाही आनंदही सालाबादप्रमाणे गोविंंदांनाही घेता आला नाही.
स्वाइन फ्लूनंतर कोरोनामुळे वर्षानुवर्षे साजरा करण्यात येणाºया उत्सवात खंड पडल्याची नाराजी गोविंदा पथकांमध्ये होती. आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरातील छोट्यामोठ्या दहीहंडी रद्द झाल्या असल्या, तरी बुधवारचा दिवस गोविंदा पथकांनी आरोग्य उत्सव म्हणून साजरा केला. बुधवारी सकाळी हंडीची प्रथेप्रमाणे पूजा करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परंपरा म्हणून थर न रचता दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, तसेच अॅण्टीजेन शिबिर आयोजित केल्याचे ठाणे जिल्हा गोविंदा पथक समन्वय समितीचे समीर पेंढारे यांनी सांगितले.
ठाणे शहरात १५० ते २०० गोविंदा पथके असून दरवर्षी छोट्यामोठ्या अशा २०० हून अधिक दहीहंडी बांधल्या जातात. यंदा कोरोनामुळे शांतता असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटातही गावदेवी येथील गोविंदा पथकाने टेंभीनाका येथील मानाच्या हंडीला सलामी दिली, तर कोपरीमधील शिवतेज महिला गोविंदा पथकाने थर न रचता हंडी फोडली.
मुंब्रा येथे जपली दहीहंडीची परंपरा
मुंब्रा : ७३ वर्षांपासून मुंब्रा येथे सुरु असलेली दहीहंडीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी हनुमान आखाड्याच्या गोविंदा पथकाने मोजक्या गोविंदांच्या मदतीने सोशल डिस्टन्सिंंगचे पालन करुन मुंब्रादेवी आणि मुंब्रेश्वर महादेव मंदिरातील मानाच्या
फक्त दोन हंड्या ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजरात फोडल्या.
गोविंदा पथक प्रत्येक वर्षी येथील विविध भागांत बांधण्यात येणाºया ७५ हून अधिक हंड्या बक्षिसाची रक्कम न स्वीकारता फक्त संस्कृती जपण्याच्या हेतूने फोडते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंंगचे उल्लंघन होऊ नये, यासाठी फक्त दोनच हंड्या फोडून परंपरा कायम राखल्याची माहिती पथकाचे अध्यक्ष सुदाम भगत यांनी ‘लोकमत’ला दिली.
सोशल मीडियावर रंगल्या आठवणी
ठाणे : यंदाचे वर्ष कोरोनाचे वर्ष असल्यामुळे इतर सण-उत्सवांप्रमाणे बुधवारी आलेल्या दहीहंडी उत्सवावरही कोरोनाचे सावट दिसून आले. उत्सवाचा आनंद प्रत्येकाला मनापासून असला, तरी तो गोविंदा पथकांनी, तसेच आयोजकांनी सोशल मीडियावर साजरा केला. कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द झाला असला, तरी सोशल मीडियावर या उत्सवाच्या आठवणी यानिमित्ताने भरभरुन रंगल्या होत्या.
प्रत्येक जण आपापल्या परिसरातील या उत्सवातील आनंदाचे क्षण, हंडी फोडतानाचे व्हिडीओ पोस्ट करीत होता आणि पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहात, जल्लोषात हा उत्सव साजरा केला जाईल, अशाही पोस्ट केल्या जात होत्या. ठाण्यातील दहीहंडी उत्सव हा जागतिक पातळीवर पोहोचला आहे. ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या वतीने तीन वर्षे आयोजित केली जाणारी दिव्यांगांची दहीहंडीदेखील रद्द करण्यात आली.
अभिनय कट्ट्याचे किरण नाकती यांनी गेल्या वर्षीच्या दिव्यांग मुलांनी फोडलेल्या दहीहंडीचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. यंदा फक्त दहीहंडीच्या आठवणीच आहेत. परंतु, या उत्सवात एकेक थर रचून दहीहंडी फोडली जाते, त्याप्रमाणे कोरोनामुक्तीचे एकेक पाऊल पुढे टाकून रुग्णांची संख्या कमी होत जावी आणि पुढील वर्षी हा उत्सव तेवढ्याच उत्साहात साजरा व्हावा, हीच प्रार्थना श्रीकृष्णाकडे आम्ही केली आहे, असे ते म्हणाले.
मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जयंती उत्सव
डोंबिवली : रामनगर भागातील श्री गोविदानंद श्रीराम मंदिरात परंपरेनुसार बुधवारी श्रीकृष्ण जयंती उत्सव संपन्न झाला. यावेळी श्रीहरीविजय ग्रंथाचा कृष्ण जन्माचा तिसरा पाठ म्हणण्यात आला. श्रीकृष्णाच्या मूर्तीला सजवण्यात आले होते. यानिमित्ताने श्रीकृष्णाचा पाळणा म्हणण्यात आला. पाळणा हार, पुष्पांनी सजवण्यात आला होता. भक्तांना बुक्क्याचा टिळा लावण्यात आला.
मंदिर बंद असताना व्यवस्थापनाने निवडक सेवेकऱ्यांसमवेत सोशल डिस्टन्सिंग पाळून उत्सव साजरा केला. पाटकर पथ येथील मंदिरात, बालभवन नजीकच्या रामाच्या मंदिरात आणि विठ्ठल मंदिरात, बाजीप्रभू चौकतील रामाच्या मंदिरात पूजन करण्यात आले. पाटकर पथ येथील मंदिरात मूर्ती सजवण्यात आल्या होत्या. सर्व ठिकाणी देऊळ बंद ठेवून प्रवेशद्वारातून दर्शन घेण्याची व्यवस्था केली होती.