नाकापेक्षा मोती जड!
By admin | Published: July 13, 2016 01:48 AM2016-07-13T01:48:38+5:302016-07-13T01:48:38+5:30
महापालिका डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या सपाटीकरणावर तब्बल चार कोटी खर्च केले जात आहे. दोन बुलडोझर व तीन पोकलन मशिनद्वारे कचऱ्याचे सपाटीकरण करण्यात येत आहे.
उल्हासनगर : महापालिका डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या सपाटीकरणावर तब्बल चार कोटी खर्च केले जात आहे. दोन बुलडोझर व तीन पोकलन मशिनद्वारे कचऱ्याचे सपाटीकरण करण्यात येत आहे. मशिनच्या किंमतीपेक्षा कंत्राटदाराचे भाडे अधिक असल्याची टीका होत आहे. स्थायी समितीने सपाटीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
उल्हासनगर पालिका आर्थिक संकटात असून विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. अशावेळी स्थायी समितीने डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा सपाटीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी तीन कोटी ९८ लाख खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सपाटीकरणावर वर्षाला चार कोटी खर्च करण्यापेक्षा त्या किंमतीत मशीनच विकत घेण्याचा सल्ला आमदार ज्योती कालानी यांनी दिला आहे. डम्पिंगची क्षमता संपल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून पर्यावरण विभागाने तीन वर्षापूर्वीच डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची नोटीस पालिकेला बजावली आहे.
कचरा उचलण्यावर दरमहा एक कोटी ३५ लाख तर वर्षाला १६ कोटीचा खर्च होतो. कचरा उचलणे व सपाटीकरणावर वर्षाला २० कोटीचा खर्च होत असल्याने दोन्ही कंत्राट वादात सापडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)