ठाण्यात कारच्या धडकेमध्ये पादचारी दाम्पत्य गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:54 AM2020-06-18T01:54:36+5:302020-06-18T15:40:29+5:30
ठाण्यातील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी अंधेरीतून आलेल्या पेशाऊ सरकार या तरुणाच्या कारने दिलेल्या धडकेमध्ये शिवाईनगर येथील राजू दास आणि सुमती दास हे दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कारचालक पेशाऊ याच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भन्नाट वेगाने जाणाऱ्या कारच्या धडकेमध्ये राजू दास (४३, रा. शिवाईनगर, ठाणे) आणि सुमती राजू दास (४०) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री उपवन भागात घडली. कारचालक पेशाऊ सरकार (२३, रा. अंधेरी, मुंबई) हा देखिल या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाला आहे. या तिघांनाही एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिवाईनगर भागात राहणारे दास दाम्पत्य १७ जून रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास उपवन ते हिरानंदानी मेडोजच्या दिशेने पायी जात होते. त्याचवेळी त्यांच्या मागून (उपवन ते हिरानंदानी मेडोजच्या दिशेने) भरघाव वेगाने आलेल्या पेशाऊ याच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे हे दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले. तर कार दुभाजकाला धडकून पदपथावर आदळली. दरम्यान, स्थानिक रहिवाशी, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि चितळसर पोलिसांनी जखमी दाम्पत्याला आणि कार चालक पेशाऊ याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यातील सुमती हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून राजू यांच्या हाताला आणि पायाला मार लागला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक तानाजी रोडे हे अधिक तपास करीत आहेत. अंधेरी भागात राहणारा पेशाऊ हा ठाण्यातील त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. तिच्यासमवेत जात असतांनाच हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पेशाऊ याच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो दारुच्या नशेत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.