डोंबिवलीत वाहतूक विभागाची २१ मद्यपिंसह १६ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 05:41 PM2018-03-02T17:41:53+5:302018-03-02T17:41:53+5:30
होळीसह धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी डोंबिवली शहर वाहतूक विभागाने गुरुवार-शुक्रवार असे दोन दिवस चोख बंदोबस्त लावला होता. त्यात होळीच्या रात्री आणि धुळवडीच्या दिवसा सुमारे २१ मद्यपिंसह १६ दुचाकीस्वारांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
डोंबिवली: होळीसह धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी डोंबिवली शहर वाहतूक विभागाने गुरुवार-शुक्रवार असे दोन दिवस चोख बंदोबस्त लावला होता. त्यात होळीच्या रात्री आणि धुळवडीच्या दिवसा सुमारे २१ मद्यपिंसह १६ दुचाकीस्वारांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतूक पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, गुरुवारी रात्री काही दुचाकींसह रिक्षा चालक व अन्य वाहनचालक मद्य पिऊन गाडी चालवतांना आढळले, त्यांच्यावर शहरात ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यापैकी काहींनी डिपॉझीट भरले तर काहींनी ते न भरल्याने त्यांच्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ज्यांनी डिपॉझीट भरले त्यातून १० हजार रुपयांची दंडात्मक रक्कम जमा झाली असल्याचेही ते म्हणाले. ताब्यात असलेल्या गाड्या पोलिस ठाण्याच्या आवारात असल्याचे सांगण्यात आले.
वाहतूक पोलिसांची नजर चुकवत दुचाकीवर तिघांना घेऊन वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे या अंतर्गतही सुमारे १६ जणांवर कारवाई करण्यात आली असून शुक्रवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईमुळे मद्य पिऊन वाहन चालवणा-यांवर आळा बसण्यास सहाय्य होते. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवणा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याने शहरात वाहन नियमांबाबत आपोआप जनजागृतीही होते. या कामी पोलिसांना ईगल ब्रिगेड फाऊंडेशनच्या सुमारे १५ स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी सहाय्य केले. वाहतूक पोलिसांनी त्या संस्थेच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.