कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना दंड; हरिनिवास सर्कलसाठी ठामपाचे फर्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:43 PM2020-10-11T23:43:55+5:302020-10-11T23:44:04+5:30
घातक आजार पसरण्याची भीती
ठाणे : ठाण्यातील हरिनिवास सर्कलजवळ कबुतरांना अन्नधान्य, खाद्यपदार्थ टाकताना कुणी आढळल्यास त्याला ५०० रुपये दंडाची शिक्षा करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी ७ आॅक्टोबर रोजी जारी केले. या आदेशानंतरही या भागात कबुतरांना खाद्यपदार्थ टाकले जात असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी ठाणे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे केली असून, यावर उपाय म्हणून येथे सीसी कॅमेरे लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नौपाडा परिसरातील हरिनिवास सर्कलजवळ नेहमी अन्नधान्य, खाद्यपदार्थ टाकल्यामुळे कबुतरे मोठ्या संख्येने गोळा होतात. या कृत्रिम कबुतरखान्यातील कबुतरांपासून जीवघेणे आजार पसरण्याची शक्यता असल्याची तक्रार मोने यांनी ई-मेलद्वारे याआधी केली होती.
तिची दखल घेऊन ठाणे पालिकेने तिथे अन्नधान्य टाकण्यास विरोध करणारे फलक लावले. अन्नधान्य टाकताना कोणी आढळल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्याचे याद्वारे पालिकेने स्पष्ट केले.
अजूनही अन्नधान्य टाकून कबुतरांना गोळा केले जात असल्याचा आरोप मोने यांनी केला आहे. कबुतरांना गोळा करण्याचे काम अन्य रहिवासी, व्यापारी करीत आहेत. या कबुतरांमध्ये असलेले विषाणू जीवघेणे असल्याचे मोने यांनी जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्यानुसार, पालिकेने दंडाचे फर्मान काढूनही पुन्हा अन्नधान्य टाकून कृत्रिम कबुतरखाना तयार केल्याची तक्रार त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी, आयुक्तांना करून कारवाईची मागणी केली.