साईलीला डेव्हलपर्ससह गावकर यांना दंड
By admin | Published: January 13, 2017 06:34 AM2017-01-13T06:34:58+5:302017-01-13T06:34:58+5:30
अनुचित प्रकारे हाती घेतलेल्या चाळबांधणी प्रकल्पातील खोलीसाठी ग्राहकाकडून रक्कम घेऊन
ठाणे : अनुचित प्रकारे हाती घेतलेल्या चाळबांधणी प्रकल्पातील खोलीसाठी ग्राहकाकडून रक्कम घेऊन पुढे कोणतीच कार्यवाही न करणाऱ्या साईलीला डेव्हलपर्स आणि सुशील गावकर यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने १० हजारांचा दंड ठोठावला आहे.
शशिकांत शिरवले यांनी साईलीला डेव्हलपर्सच्या नेवाळी येथील प्रस्तावित चाळ प्रकल्पात खोली १ लाख ८० हजारांना घेण्याचे ठरवले. यासाठी २१ जानेवारी २०१४ रोजी त्यांनी ११ हजार धनादेशाद्वारे दिले. त्यानंतर, गावकर यांनी खोलीचा करारनामा करण्याचे मान्य केले. परंतु, तो केला नाही. मार्च २०१४ पर्यंत शिरवले यांनी ९० हजार रुपये दिले. त्यानंतर, साईलीला डेव्हलपर्सने तो चाळ प्रकल्प बंद केल्याची माहिती मिळताच शिरवले त्या ठिकाणी गेले. तेथे गेल्यावर त्यांना माहिती मिळाली की, हा प्रकल्प सरकारी जमिनीवर अनधिकृतपणे सुरू केला होता आणि सरकारी अधिकाऱ्यांनी ती बांधकामे पाडून टाकली आहेत. त्यामुळे त्यांनी डेव्हलपर्सकडे आपली रक्कम परत मागितली. मात्र, कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी साईलीला डेव्हलपर्स व गावकर यांच्याविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली.
अनुचित पद्घतीने चाळबांधणीचा प्रकल्प हाती घेऊन त्यातील खोलीविक्रीसाठी रक्कम स्वीकारून आणि नंतर ती रक्कम परतही न करून साईलीला बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स आणि सुशील गावकर यांनी सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे त्यांनी शिरवले यांना तक्रार खर्च १० हजार आणि खोलीसाठी स्वीकारलेले ९० हजार १२ टक्के व्याजासह परत द्यावेत, असे आदेश मंचाने दिले. (प्रतिनिधी)