भाजपा नगरसेवकांच्या दबंगगिरीच्या निषेधार्थ उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांचे पेनडाऊन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 05:17 PM2021-03-02T17:17:20+5:302021-03-02T17:17:31+5:30
उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागाकडून भाजपच्या १३ नगरसेवकांचे विकासकामे होत नाही.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका बांधकाम विभागात शहर अभियंता महेश शितलानी यांच्या सोबत भाजपा नगरसेवकांनी हुज्जत घालत आरडाओरडा केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी ६ वाजता घडला. यावेळी कामगार नेता राधाकृष्ण साठे यांची मध्यस्थी अयशस्वी झाल्यावर, नगरसेवकांच्या दबंगगिरीच्या निषेधार्थ कामगार संघटनेने मंगळवारी पेनडाऊन आंदोलन करून नगरसेवकांच्या दबंगगिरीचा निषेध केला.
उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागाकडून भाजपच्या १३ नगरसेवकांचे विकासकामे होत नाही. याबाबतचा जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी व नगरसेवक प्रदीप रामचंदानी असे तिघे जण सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान बांधकाम विभागात गेले. शहर अभियंता व कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांच्या सोबत चर्चा करीत असताना त्यांच्या मध्ये आरडाओरड झाली. यावेळी सर्वाधिक आवाज नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांचा येत असल्याने, महापालिका मुख्यालयात उपस्थित असलेले कामगार नेते राधाकृष्ण साठे तेथे गेले. त्यांनी नगरसेवक रामचंदानी यांना समजावत आरडाओरड करू नका. असे सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महेश शितलानी हे आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या सोबत एका विकास कामे पाहण्यासाठी निघून गेले.
महापालिका बांधकाम विभागात नगरसेवक रामचंदानी यांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी मंगळवारी कामगारांना पेनडाऊन आंदोलनाची हाक दिली. आज दुपार पर्यंत कामगार पेनडाऊन आंदोलनात सहभागी झाले. मात्र दुपारनंतर आयुक्तांच्या विनंतीला साद देत काम सुरू केल्याची माहिती कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी दिली. नेहमी वादात राहिलेल्या बांधकाम विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून स्थायी कार्यकारी अभियंता मिळाला नाही. महेश शितलानी यांच्याकडे शहर अभियंता पदासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्याचा प्रभारी पदभार दिला आहे. दरम्यान शितलानी यांची तब्येत बरोबर नसल्याने ते पूर्ण वेळ देऊ शकत नसल्याने, विभागात सावळागोंधळ उडाला. आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कामाबाबत चर्चा करणे गैर आहे का?...रामचंदानी
भाजप नगरसेवकांचे विकास कामे होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी विरोधीपक्षनेते किशोर वनवारी, भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह स्वतः सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान बांधकाम विभागात गेले होते. जाब विचारण्यात गैर काय?. चर्चेवेळी आरडाओरड झाली असून कामगार संघटनेने यामध्ये पडणे कितपत योग्य आहे?. असा प्रश्न भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला.