"जेथे स्वच्छता दिसते तेथे लोक कचरा टाकत नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 09:23 AM2023-12-31T09:23:20+5:302023-12-31T09:24:48+5:30
जेथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.
ठाणे : ठाण्यातील प्रदूषण तुलनेने कमी असून, ते आणखी कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरितपट्टे तयार करावेत, जेणेकरून ऑक्सिजन पार्क तयार होतील. तसेच मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करून शहरात जंगले तयार करावीत, त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जेथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.
बीएमसी पाइपलाइन येथे साठलेला कचरा साफ केल्यानंतर त्याठिकाणी ग्रीन पॅच तयार करून तो परिसर हिरवागार करा. जेणेकरून नागरिकांना फरक दिसेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. हे अभियान राज्यभर राबविणार असल्याचे शिंदे म्हणाले.
सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
ठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन करावे, त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. स्वच्छता अभियानाचे ठाणे महापालिकेने केलेले नियोजन हे उत्कृष्ट असल्याचा मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. यावेळी सफाई कर्मचारी जयेश गायकवाड व अनिता शिरसाट यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सर्वंकष स्वच्छता मोहिमेला वागळे परिसरात पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास प्रारंभ केेला. या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह अनेकांनी हाती झाडू घेत स्वच्छता केली.