पालिका रुग्णालयातील प्रिंटर पेपरविना बंद; पेपर त्वरीत उपलब्ध करुन न दिल्यास आंदोलन छेडण्याचा मनविसेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 04:38 PM2018-03-22T16:38:04+5:302018-03-22T16:38:04+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेत झेरॉक्स पेपरचा वानवा निर्माण झाल्याने पालिका रुग्णालयासह शवविच्छेदन केंद्रातील प्रिंटर पेपरविना बंद पडले आहेत.
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत झेरॉक्स पेपरचा वानवा निर्माण झाल्याने पालिका रुग्णालयासह शवविच्छेदन केंद्रातील प्रिंटर पेपरविना बंद पडले आहेत. यामुळे रुग्ण व मयताच्या नातेवाईकांना अत्यावश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती काढण्यासाठी खाजगी झेरॉक्सच्या दुकानात धाव घ्यावी लागत आहे. रुग्णालयासह केंद्रात त्वरीत पेपर उपलब्ध करुन न दिल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर सचिव शान पवार यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावरुन पालिकेत निधीची चणचण जाणवू लागल्याचा प्रत्यय येत असला तरी प्रशासनाकडून पेपरलेस कारभाराला सुरुवात झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु काही आवश्यक बाबींमध्ये कागदपत्रांची छायांकित प्रत काढणे अत्यावश्यक ठरत असल्याने सध्यातरी पालिकेत पेपरलेस कारभार सुरुच झाला नसल्याचे दिसुन येत आहे. सध्या पालिकेत झेरॉक्स पेपरची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने असलेले पेपर संगणक चालकांसह सर्व विभागांकडुन जपून वापरले जात आहेत. ज्यांच्याकडे पेपरच नाही ते एका बाजुला छपाई झालेले परंतु, एका बाजुला कोरे असलेले पेपर वापरले जात आहेत. अशातच अत्यावश्यक सेवेंतर्गत असलेल्या पालिका शवविच्छेदन केंद्रात मयताच्या नातेवाईकांना शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी प्रशासनाने झेरॉक्स मशीनऐवजी एक सुस्थितीतील प्रिंटर बसविला आहे. त्याद्वारे मयताच्या नातेवाईकांना अहवाल तसेच काही कागदपत्रांची छायांकित प्रती दिल्या जातात. परंतु, पालिकेच्या भांडार विभागात झेरॉक्स पेपरच उपलब्ध नसल्याने केंद्रातील प्रिंटर पेपरविना बंद पडले आहेत. अशीच परिस्थिती पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात निर्माण झाली असुन अनेकदा स्थानिक पोलिस आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात येत असतात. त्यांना देखील आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती तेथे बसविण्यात आलेल्या प्रिंटरद्वारे दिल्या जातात. तेथेही पेपरचा तुटवडा निर्माण झाल्याने पोलिसांना आरोपीसोबत खाजगी झेरॉक्स दुकानांत फिरावे लागत आहे. यावर पर्याय म्हणुन स्थानिक जय मल्हार प्रतिष्ठानने रुग्णालयात २४ तास झेरॉक्स मशीन उपलब्ध करुन देण्याची मागणी नुकतीच आरोग्य विभागाकडे केली होती. त्यावर आरोग्य विभागाचे प्रभारी मुख्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी, झेरॉक्स मशीनऐवजी शवविच्छेदन केंद्रात प्रिंटर बसविण्यात आल्याचे सांगुन सध्या त्यासाठी लागणारे पेपरच उपलब्ध नसल्याने प्रिंटर बंद असल्याचे लेखी उत्तर दिले. पेपर उपलब्ध झाल्यानंतर ते रुग्णालयासह केंद्राला देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यावर पवार यांनी त्वरीत पेपर उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी करुन प्रशासनाला ५ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.