'लॉकडाऊनमुळे लोकांना खायला अन्न नाही अन् कोरोना टेस्टसाठी ३ हजार भरायचे'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 07:13 PM2020-05-21T19:13:37+5:302020-05-21T19:13:46+5:30
महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेने खासगी रुग्णालये अधिग्रहीत केली होती. 24 मार्च ते 15 मेर्पयत या रुग्णालयत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना मोफत उपचार दिले गेले.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना उपचारासाठी बिल आकारणार हे महापालिकेने दोन दिवसापूर्वी जाहिर केल्यानंतर आत्ता कोरोना टेस्टसाठी प्रत्येक रुग्णाला तीन हजार रुपये खर्च द्यावा लागणार. बिलापाठोपाठ आत्ता टेस्टलाही पैसे आकारणो सुरु झाल्याने लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध करीत उपचार व टेस्टींग मोफत केली जावी अशी मागणी केली आहे. नागरीकांमध्येही याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेने खासगी रुग्णालये अधिग्रहीत केली होती. 24 मार्च ते 15 मेर्पयत या रुग्णालयत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना मोफत उपचार दिले गेले. मात्र, 16 मे पासून कोरोना रुग्णाना बिल भरावे लागेल. पिवळे व केशरी रंगाच्या रेशनकार्डधारक वगळता अन्य रुग्णांना उपचाराचे बिल भरावे लागेल. या महापालिकेने घेतलेल्या निर्णयाला लोकप्रतिनिधींकडून तीव्र विरोध होत आहे. प्रशासनाकडून या विरोधाची दखल घेतली जात नाही. महापालिका हद्दीत कोरोना रुग्णाची टेस्टची सोय नव्हती. महापालिकेने क्रेष्णा डायग्नोस्टीक सोबत करार करुन महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात टेस्टींगची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ देणे आज 21 मेपासून सुरु केले आहे. यासंदर्भात रुक्मीणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता कोरोना टेस्टसाठी तीन हजार रुपये आकारले जाणार आहे. सरसकट सगळ्य़ाच रुग्णांना टेस्टसाठी तीन हजार रुपये भरावे लागणार आहेत. बाहेर खासगी लॅबमध्ये कोरोनाची टेस्ट केल्यास त्याकरीता चार ते साडे चार हजार रुपये आकारले जातात. महापालिका रुग्णालयात टेस्ट केल्यास खर्चात एक ते दीड हजार रुपये कमी खर्च होतो.
दरम्यान कल्याण पूव्रेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या घरात खायला अन्न नाही. रोजगार व कामधंदा ठप्प असल्याने खिशात पैसा नाही. हाताला काम नाही. अशा परिस्थितीत एक सामान्य व्यक्ती टेस्टसाठी तीन हजार रुपये कुठून आणणार. टेस्टचे एक कीट बाजारात 1200 रुपये किमंतीला मिळते. महापालिका व राज्य सरकार टेस्टच्या नावाखाली आरोग्य सेवेचा बिझनेस करीत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. कोरोना रुग्णांना मोफत उपचार दिले गेले पाहिजेत अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.