खरी शिवसेना कोणाची हे जनतेने मागील तीन महिन्यात दाखवून दिले : अंबादास दानवे
By अजित मांडके | Published: September 28, 2022 10:24 PM2022-09-28T22:24:34+5:302022-09-28T22:25:10+5:30
Ambadas Danve : बुधवारी रात्री दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
ठाणे : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्रिमंडळाने पाठवलेली बारा जणांची नावे जाहीर करण्यात राज्यपालांनी जाणीवपूर्वक वेळ काढला. त्यामुळे न्यायालयाने योग्य पाऊल उचलले, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाण्यात केले.
बुधवारी रात्री दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. खरी शिवसेना कोणाची हे जनतेने मागील तीन महिन्यात दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जनतेचा प्रतिसाद मिळते आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.
याचबरोबर, राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीला न्यायालयाने दिलेल्या स्थगिती बाबत त्यांना विचारले असता. न्यायालयाने योग्य पाऊल उचलले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने जी यादी दिली होती, त्यावर निर्णय झाला नाही. त्याकरिता लोक न्यायालयातही गेली. ही यादी आधीच मंजूर व्हायला पाहिजे होती. मात्र आता आठ दिवसांत यादी बाहेर येते. याचा अर्थ त्यावेळी राज्यपालांनी अन्याय केला होता. हा अन्याय महाराष्ट्राची जनता आणि आम्हीही सहन करणार नाही, असे दानवे यांनी सांगितले.