Coronavirus: आता 'त्या' व्यक्तींनाही थेट घराबाहेर पडता येणार नाही; पोलीस परवानगी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 07:34 PM2020-03-25T19:34:37+5:302020-03-25T19:39:27+5:30
पडताळणी करुन ओळखपत्र दिले जाणार; पोलीस आयुक्तांनी काढले आदेश
ठाणे: विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अशीच कारवाई बुधवारी ठाण्यातील आनंदनगर जकात नाका येथे कोपरी पोलिसांनी केली. अर्थात यापुढे अत्यावश्यक कारणासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असून त्याबाबतचे ओळखपत्र किंवा परवानगीचे पत्र संबंधित पोलीस ठाण्यांकडून दिले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
ठाणे शहरासह संपूर्ण राज्यभरात सध्या संचारबंदी लागू झालेली आहे. असे असतानाही अनेक टवाळखोर तरुण मंडळी विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावर येत आहेत. काही जण तर कोणतेही कारण नसतांना मुंब्रा ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई असाही प्रवास करीत असल्याचे आढळले आहे. ही बाब निदर्शनास येताच आनंदनगर जकात नाका येथे कोपरी पोलिसांच्या गस्ती पथकाने बुधवारी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान या भागात नाकाबंदी केली होती. त्यावेळी चार जणांचे टोळके मुंब्रा येथून ठाण्यात येत होते. ‘आम्हाला अंधेरी येथे औषधे घेण्यासाठी जायचे आहे,’ अशी बतावणी त्यांनी पोलिसांना केली. मुंब्रा ते ठाणे दरम्यान अनेक औषधांची दुकाने असतांना अंधेरीमध्ये कशासाठी जात आहात? या प्रश्नावर मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर पोलिसांनी त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा करीत लाठीचाही प्रसाद दिला. तर काही वाहन धारकांना पुन्हा ठाण्याच्या दिशेने पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, यापुढे एखाद्या गरोदर महिलेला मुंबई किंवा ठाण्यातून पुण्याला जायचे असेल. आजारी रुग्णाला प्रवास करायचा असेल किंवा एखादा भाजी विक्रेता असेल अशा व्यक्तींनी संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधून परवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा झाल्यानंतर अशा अत्यावश्यक बाबींसाठी ओळखपत्र किंवा परवानगीचे पत्र दिले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.