गद्दारांना निवडणुकीत जनता उत्तर देईल- राजन विचारे
By अजित मांडके | Published: January 27, 2023 02:48 PM2023-01-27T14:48:28+5:302023-01-27T14:48:28+5:30
एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर नाव न घेता केली टीका
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: दिघे साहेब गेलेले नाहीत, ते आपल्या सगळ्यात आहेत, त्यामुळे आनंदाश्रम चे नाव कोणीही बदलू शकत नाही, तसेच दिघे यांचे आशीर्वाद आजही सचाई सोबत आहेत, त्यामुळे ते बघत असून ते आगामी निवडणुकीत त्याचे उत्तर जनता देईल अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त शिंदे गटाने खारकर आळी येथील दिघे यांच्या स्मृतीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तर यावेळी शक्ती स्थळावर दिघे यांचे दर्शन घेण्यासाठी विचारे आले होते. यावेळी त्यांनी ही टीका केली. दिघे यांना टाडा लागला होता पण ते घाबरले नाहीत, ते लढले त्यांची शिकवण होती गद्दाराना क्षमा नाही, हे ठाणेकर आजही विसरले नाहीत त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्यांना दाखुवून देईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संजय शिरसाठ यांच्या बाबत त्यांना विचारले असता, त्यांना एबी फॉर्म कोणी दिला, आमदार कोणामुळे झालात हे जर तुम्ही विसरत असाल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची शुक्रवारी जयंती होती. यानिमित्ताने शिंदे गटाने खारकर आळी येथील दिघे यांच्या स्मृतीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिघे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी ठाकरे गटाने ठाण्यात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे गटाने शक्तिप्रदर्शन केले होते. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात होणाऱ्या दिघे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे महत्व वाढले होते. या कार्यक्रमानिमित्ताने शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार होते. या स्मृतिस्थळी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही दर्शनासाठी येणार असल्याने दोन्ही गट आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात होती.
दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री शिंदे हे आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळी येणार होते. परंतु त्यांच्या येण्याच्या आधी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांसह स्मृतिस्थळी येऊन दर्शन घेऊन निघून गेले. या निमित्ताने ठाकरे गटाने याठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिंदे यांच्या उपस्थितीआधी त्यांनी दर्शन घेतल्याने दोन्ही गट आमने सामने येण्याचा प्रसंग टळला.