प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी एप्रिलमध्ये लोक न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:01+5:302021-03-18T04:40:01+5:30
ठाणे : प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ...
ठाणे : प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १० एप्रिलला सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा सत्र न्यायालय, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार न्यायालये, सहकार न्यायालये आणि इतर न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दिवाणी, फौजदारी, तडजोडीस पात्र, वैवाहिक स्वरूपाची, धनादेशासंबंधीचे, १३८ एन. आय. कायद्यान्वये दाखल प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगारविषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणीविषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे आदी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी पक्षकारांनी त्यांचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी या लोक न्यायालयात दाखल करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
येथे अर्ज करण्याचे आवाहन
- संबंधित प्रकरणे निकालासाठी ठेवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- लोक न्यायालयाबाबत कोणतीही चौकशी करायची असल्यास वाशी-नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, पालघर, वसई, वाडा, डहाणू, जव्हार आदी कार्यालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सेवा सदन पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर ठाणे, येथे प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.
--------------------