रहिवासी असलेल्या इमारतींवरील कारवाईने लोकप्रतिनिधी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:23+5:302021-07-27T04:42:23+5:30
ठाणे : अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या इमारतींसोबतच ग्रामपंचायतकाळातील जुन्या आणि धोकादायक इमारती तोडून नव्याने बांधण्यात आलेल्या तसेच रहिवाशांचे ...
ठाणे : अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या इमारतींसोबतच ग्रामपंचायतकाळातील जुन्या आणि धोकादायक इमारती तोडून नव्याने बांधण्यात आलेल्या तसेच रहिवाशांचे वास्तव्य असलेल्या इमारतींवरही कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. या कारवाईला लोकप्रतिनिधींकडून विरोध होत असून कळव्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीनशे ते चारशे नागरिकांसमवेत महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांची भेट घेतली आहे. जुन्या इमारतींना नव्याने बांधण्यासाठी महापालिका एकीकडे परवानगी देत नाही, दुसरीकडे धोकादायक म्हणून नागरिकांना बेघर करणे योग्य नाही. १२ ते १५ वर्षे नागरिक हक्काच्या घरापासून दूर भाड्याच्या घरात जीवन व्यतीत करत आहेत. महापालिका या गोष्टींचा विचारच करणार नसेल, तर मग अनधिकृत बांधकामे का होणार नाहीत, असा प्रतिप्रश्नच लोकप्रतिनिधींनी यावेळी विचारला.
ठाणे महापालिकेत खांदेपालट केल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विशेषकरून कळवा प्रभाग समितीमध्ये नुकत्याच रुजू झालेल्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी कारवाईचा धडाकाच लावला आहे. सोमवारी खारेगाव येथील एका अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली. या इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढून कारवाई केल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे संतापलेल्या कळवा खारेगावमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्तांकडे दाद मागितली आहे.
कळवा खारेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतकाळात बांधकामे झाली असून ती जुनी आणि धोकादायक झाली आहेत. एफएसआय शिल्लक नसल्याने तसेच दाटीवाटीने ही सर्व बांधकामे उभी राहिली असल्याने जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी महापालिका परवानगी देत नाही. दुसरीकडे इमारत धोकादायक झाल्याने रहिवाशांना बाहेर काढून त्यांची रेंटलच्या घरात रवानगी केली जाते. १० ते १२ वर्षे नागरिक रेंटलच्या घरात राहत असून त्यांना आपला हक्काचा निवारा मिळालेला नाही. जुनी इमारत जेवढ्या मजल्यांची आहे, तेवढी बांधण्याची परवानगी द्या, अशी मागणी रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.