लाचखोरांमध्ये वाढतोय दलालांचा टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:48 AM2018-05-28T06:48:29+5:302018-05-28T06:48:29+5:30
लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे, असे फलक हमखास शासकीय कार्यालयात नजरेस पडतात. तरीही, सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून लाच घेतली जाते.
ठाणे - लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे, असे फलक हमखास शासकीय कार्यालयात नजरेस पडतात. तरीही, सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून लाच घेतली जाते. त्यातच यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)मोठ्या प्रमाणात जनजागृती हाती घेतल्याने कारवाईचे प्रमाण वाढू लागले आहे. या कारवायांमध्ये लोकसेवकच नाही, तर खाजगी व्यक्ती (दलाल) यांचा टक्का वाढू लागला आहे. तो मागील दीड वर्षातील एकूण कारवाईत सुमारे ४० टक्के इतका असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच अशाप्रकारच्या एका गुन्ह्यात एक दलाल व्यक्तीला न्यायालयाने नुकतीच शिक्षाही ठोठावली आहे. कारवाई केलेल्या तपासात पकडलेले दलाल प्रामुख्याने महसूल विभागाशी निगडित ठिकाणी पकडल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
शासननिर्मित ३९ विभाग आहेत. त्या सरकारी कार्यालयांतपैसे घेतल्याशिवाय कामे होत नाही, असा समज असतानात्या संबंधित ठाणे एसीबी विभाग दरवर्षी जनजागृती मोहीम हाती घेऊन नागरिकांना जागृत करण्याचे काम करतो. यातून तक्रारीचे प्रमाण वाढले असून आलेल्या तक्रारीची खातरजमा झाल्यावर लाचेची मागणी करणाºयांविरोधात सापळा लावून कारवाई करण्यात येते. त्यामध्ये लोकसेवकांसह आता खाजगी व्यक्तीही मोठ्या प्रमाणात पकडले जात आहेत. अशाप्रकारे ठाणे एसबीसी कार्यक्षेत्रात मागील दीड वर्षात १४७ ठिकाणी सापळे लावण्यात आले. या कारवाईत, एकूण २०८ जणांना रंगेहाथ लाच घेताना पकडले. यामध्ये ३३ जण खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.
लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार केली जाते. यामध्ये साधारणत: सहा महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत शिक्षा होते. तसाच एक निकाल नुकताच न्यायालयाने दिला आहे. तसेच खाजगी व्यक्तींवर कारवाई केल्यानंतर तपास करताना फारसे काही अडथळे येत नाहीत. त्यातच, त्याच्या चौकशीत लोकसेवकापर्यंत पोहोचता येते.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती
लोकसेवकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकाही लोकसेवकाला अटक झालेली नाही. सर्वसामान्य नागरिक प्रचंड जागृत झालेला आहे. तो पैसे मागितल्यावर तातडीने तक्रारीसाठी एसीबीच्या कार्यालयात येतो. अन्यथा, तो थेट एसीबीच्या मुख्यालयात जाऊनही तक्रार करतो.त्यामुळे कारवाईचे प्रमाण वाढले आहे. पोलीस दलात प्रामुख्याने लोकसेवक पकडले जात आहेत. तर,खाजगी व्यक्ती हे महसूल विभागात पकडले गेल्याची माहिती एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याचा अटीवर माहिती दिली.