आज सायंकाळी प्रचाराला पूर्णविराम
By admin | Published: February 19, 2017 04:18 AM2017-02-19T04:18:39+5:302017-02-19T04:18:39+5:30
माघाची थंडी असूनही गेला महिनाभर निवडणुकीच्या निमित्ताने तापलेले वातावरण आणि त्यानिमित्ताने जाहीर सभा, बैठका, रोड शो, चौक सभांच्या माध्यमातून सुरू असलेले
- स्नेहा पावसकर, ठाणे
माघाची थंडी असूनही गेला महिनाभर निवडणुकीच्या निमित्ताने तापलेले वातावरण आणि त्यानिमित्ताने जाहीर सभा, बैठका, रोड शो, चौक सभांच्या माध्यमातून सुरू असलेले शब्दांचे प्रहार अर्थात प्रचार तोफा रविवारी सायंकाळी थंडावतील. बहुतांशी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या ठाण्यात सभा झालेल्या आहेत. तरीही, प्रचाराचा शेवटचा दिवस आणि तोही रविवार आल्याने मात्र सर्वपक्षीय उमेदवार दिवसभर नॉन-स्टॉप जमके प्रचार करण्याच्या तयारीत आहेत.
ठाण्यात अनेक इच्छुकांनी तिकीट मिळण्यापूर्वीच प्रभागांमध्ये प्रचार सुरू केला होता. तरीही, अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गेले १५ दिवस उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या पाहायला मिळाल्या. पालिकेच्या निवडणुकीत ८०५ उमेदवार रिंगणात उतरलेले असले, तरी स्थानिक नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. उमेदवार हे प्रचारासाठी काही तास उरले असताना आता नेमक्या आणि आपली व्होट बँक मानल्या जाणाऱ्या विभागांमध्ये पुन्हा मतदारांना साद घालणार आहेत. तर, ज्यांना बहुतांशी मतदारांपर्यंत पोहोचता आलेले नाही, असे उमेदवार रविवारी दुपारची विश्रांती अथवा बैठका टाळून सकाळपासूनच सायंकाळपर्यंत नॉन स्टॉप प्रचार करणार आहेत. त्यासाठी त्यांनी विभागनिहाय नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर काही उमेदवार अधिकाधिक कार्यकर्त्यांना घेऊन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी घरातील पुरुष मंडळींबरोबरच स्त्रिया, तरुणवर्गालाही शेवटच्या प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांमार्फत केले जात आहे. त्यामुळे रविवारी उमेदवारांची दमछाक होणार आहे. (प्रतिनिधी)
स्क्रीनचे भाडे वाढले
- ठाण्यात अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या जाहीर सभा, चौक सभा, रोड शो यापूर्वीच झालेले आहेत. त्यामुळे ज्या विभागांमध्ये उमेदवारांना पुन्हा जाता येणे शक्य नाही, अशा ठिकाणी नेत्यांची भाषणे एलईडी स्क्रीनवर सुरू असलेले रिक्षा-टेम्पो फिरताना दिसत आहेत.
- रविवारी अधिकाधिक विभागांमध्ये एलईडी स्क्रीनवरील भाषणेही मतदारांच्या कानी पडतील. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांसाठी काही उमेदवारांनी डेकोरेटर्सकडून एलईडी मोठ्या प्रमाणात भाड्याने घेतलेले असून त्याचे एका दिवसाचे भाडे किमान ५ ते ७ हजारांनी वाढले आहे.