वेध परतीच्या पावसाचे : विजांचा कडकडाट आणखी काही दिवस, दिवाळीच्या खरेदीपर्यंत बरसणार सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:17 AM2017-09-15T06:17:39+5:302017-09-15T06:17:47+5:30
सध्या विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस धडकी भरवत असला, तरी या महिनाअखेरपर्यंत अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची अधूनमधून हजेरी लागणार असल्याने दिवाळीच्या खरेदीच्या काळातही हा पाऊस ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सोबत करेल, असे हा अंदाज सांगतो.
ठाणे : सध्या विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस धडकी भरवत असला, तरी या महिनाअखेरपर्यंत अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची अधूनमधून हजेरी लागणार असल्याने दिवाळीच्या खरेदीच्या काळातही हा पाऊस ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सोबत करेल, असे हा अंदाज सांगतो.
गेले चार दिवस वेगवेगळ््या वेळी पडणारा पाऊस सोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट घेऊन येतो आहे. प्रचंड कडकडाटामुळे धडकी भरावे असे वातावरण असले, तरी या महिना अखेरीपर्यंत अधूनमधून असाच पाऊस पडत राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पंधरवडाभर तरी जोरदार सरी कोसळतील, अशीही शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नंतर मात्र त्यांचे प्रमाण कमी कमी होत जाईल. मात्र या काळात कडकडीत ऊन, आर्द्रतेमुळे घामाच्या धारा आणि त्यात दिलासा देणारा पाऊस असेच चित्र अनुभवायला मिळेल.
हा पाऊस जरी परतीचा असला, तरी तो जाता जाता जोरदार हजेरी लावून जातो, असे आजवरचे चित्र आहे. त्यातही साधारणत: चार महिने गृहीत धरला जाणारा पाऊस हल्ली दोन महिन्यातच सरासरी पूर्ण करतो, असाही आलेख हवामान खात्याने मांडला आहे. यंदाही तसेच चित्र असले; तरी पावसाळ््याच्या संपूर्ण काळात अनुभवायला मिळाला नाही, इतका विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सध्या अनुभवायला मिळतो आहे. त्याची तीव्रता महिनाअखेरपर्यंत कमी होत जाण्याची शक्यता आहे. मात्र आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाच्या सरी कोसळणार असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाºयांना हा पाऊस सोबत करण्याची शक्यता आहे.
आॅक्टोबर हीट वाढणार : आॅक्टोबर हिटच्या काळात साधारण ३३ अंशापर्यंत सरासरी तापमान असते. पण यंदा ते ३७ ते ३८ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात तापमान तेवढे असले तरी आर्द्रता, वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे होणारे प्रदूषण-त्यातून झालेली तापमानवाढ आणि काँक्रिटीकरणामुळे वाढलेले तापमान यांच्या परिणामामुळे त्याचे चटके ३८ ते ४० अंश सेल्सियस इतके जाणवतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
गरब्यालाही सोबत : पुढच्या आठवड्यात २१ सप्टेंबरपासून सुरू होणारे नवरात्र जरी २९ तारखेला संपणार असले तरी गरबा मात्र १ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहील, अशी चिन्हे आहेत. महिनाअखेरपर्यंत पावसाच्या दमदार सरी कोसळणार असल्याने रास दांडियाच्या उत्साहाच्या सोबतीला पावसाचीही हजेरी असेल.