स्थायी समिती मार्ग अखेर होणार मोकळा; कोकण आयुक्तांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 02:22 AM2019-07-05T02:22:10+5:302019-07-05T02:22:22+5:30
कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीचे गठन झाले नसले तरी स्थायी समितीचे कामकाज चालवण्यास हरकत नसल्याचा सल्ला ज्येष्ठ विधीतज्ज्ञांनी महापालिका प्रशासनाला दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे : शिवसेनेने चुकीच्या पद्धतीने स्थायी समिती सदस्यांची निवड केल्याने स्थायी समितीचा मार्ग खडतर झाला होता. परंतु, आता स्थायी समिती गठीत करण्याबरोबरच सभापतीनिवडीचाही मार्ग मोकळा झाला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीचे गठन झाले नसले तरी स्थायी समितीचे कामकाज चालवण्यास हरकत नसल्याचा सल्ला ज्येष्ठ विधीतज्ज्ञांनी महापालिका प्रशासनाला दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्याचाच आधार घेऊन आता स्थायी समितीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे.
यानुसार, आता या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना दिल्याचीही माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यांनी निवडणूक कार्यक्र म जाहीर केल्यानंतर पुढील प्रक्रि या पालिका प्रशासनाकडून पार पाडली जाणार आहे. सुरुवातीपासूनच संख्याबळावरून स्थायी समिती गठीत करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु, असे असतानाही पूर्वीचीच परंपरा कायम राखून शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी स्थायी समिती सदस्यांची निवड केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपने एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्यानंतर स्थायी समितीवर युतीची सत्ता सहज प्रस्थापित होऊ शकते. मात्र, त्याचा मोबदला भाजपला द्यावा लागू नये, यासाठी शिवसेनेने २०१८ साली केलेल्या खेळीची पुनरावृत्ती केली आहे. कोकण विभागीय आयुक्तांचे संख्याबळाचे आदेश धुडकावून काँग्रेसचा गट सेनेसोबतच असल्याचा दावा करून सेनेने आपल्या कोट्यातून काँग्रेसच्या यासीन कुरेशी यांच्यासह नऊ जणांची निवड केली आहे. ही निवड प्रक्रि या बेकायदा असल्याचे सांगून राष्ट्रवादीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला होता. मात्र, अद्याप तशा कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत.
भूमिकेकडे लक्ष
- कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाचे पालन न झाल्याने स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक घेता येईल का, याबाबत प्रशासनाने कायदेशीर सल्ला वरिष्ठ विधीतज्ज्ञांकडून मागवला होता.निवडप्रक्रि येपेक्षा त्यांनी स्थायी समितीच्या कामकाजाला जास्त महत्त्व असल्याचा अभिप्राय नोंदवून या निवडीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे आता स्थायी समितीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच सभापतीपदाची निवड होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही निवडणूक घेण्यापूर्वी कोकण विभागीय आयुक्तांचा अभिप्राय प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. त्या अभिप्रायावर निवडणुकीचा निर्णय अपेक्षित असल्याचेही पालिकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.