स्थायी निवडणूक; सेनचे बंडखोर म्हात्रे घेणार माघार ?
By admin | Published: December 15, 2015 01:04 AM2015-12-15T01:04:21+5:302015-12-15T01:04:21+5:30
१६ डिसेंबर रोजी पार पडणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शिवसेनेतील बंडखोरीमुळे चर्चेत आली आहे. पक्षाचे बंडखोर उमेदवार प्रभाकर म्हात्रे यांना माघार घेण्यासाठी थेट मातोश्रीवरुन
- राजू काळे, भार्इंदर
१६ डिसेंबर रोजी पार पडणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शिवसेनेतील बंडखोरीमुळे चर्चेत आली आहे. पक्षाचे बंडखोर उमेदवार प्रभाकर म्हात्रे यांना माघार घेण्यासाठी थेट मातोश्रीवरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आदेश दिल्याने ते उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
पालिकेत सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली आहे. त्यावेळी शिवसेनेकडून महापौरपदावर दावा सुरु झाल्याने त्यावर ज्येष्ठतेनुसार नगरसेवक प्रभाकर म्हात्रे यांची दावेदारी सुरु झाली होती. परंतु, दोन्ही पक्षांच्या तहानुसार हे पद भाजपाच्या वाट्याला तर उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला आले. म्हात्रे उपमहापौर न झाल्याने त्यांना पुढे प्रभाग समिती क्र. ६ मधील सभापतीपदी निवडून आणले. सध्या त्यांचा स्थायीत समावेश झाल्याने यंदाचे सभापतीपदही आपल्यालाच मिळणार, अशी आशा त्यांना होती. मात्र पक्षाने गतवेळेप्रमाणे यंदाचे दावेदार हरिश्चंद्र आमगावकर यांनाच उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीसह बहुजन विकास आघाडीचा पाठींबा मिळवून उमेदवारी दाखल केली. ती मागे घेण्यासाठी सेनेतील वरीष्ठांकडून दबावतंत्राचा वापर होत होता.
- अखेर मातोश्रीवर साकडे घातल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये त्यांना रविवारी (१३ डिसेंबर) पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी आमंत्रित केले होते. तेथे पालकमंत्र्यांनी बंडखोरीवरील परिणामाच्या कानपिचक्या त्यांना देऊन जी काही नाराजी असेल त्यावर नंतर चर्चा केली जाईल, पहिल्यांदा उमेदवारी मागे घ्या, असे फर्मान सोडले.