स्थायीने मुख्य लेखापरीक्षकांचे छाटले पंख; ठोक मानधनावरील लेखाधिका-यांच्या मुदतवाढीस स्थायीचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 06:59 PM2018-01-15T18:59:18+5:302018-01-15T19:00:16+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेतील आर्थिक कारभार वेगाने हातावेगळा होण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी मुख्य लेखापरीक्षकांच्या सहाय्याकरिता ठोक मानधनावर दोन लेखाधिका-यांची नियुक्ती केली होती.
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील आर्थिक कारभार वेगाने हातावेगळा होण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी मुख्य लेखापरीक्षकांच्या सहाय्याकरिता ठोक मानधनावर दोन लेखाधिका-यांची नियुक्ती केली होती. त्यांची मुदत ४ जानेवारीला संपुष्टात आली असून, मुख्य लेखापरीक्षकांच्या निर्देशामुळे प्रत्येक फायलींवर आक्षेपार्ह शेरा मारला जात असल्याने त्या लेखाधिकाऱ्यांना स्थायीने मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने पालिकेत मुख्य लेखापरीक्षकांचेच पंख छाटल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
पालिकेत टक्केवारीचा गोरखधंदा नवीन नाही. टक्केवारीतून विकासकामांचा सपाटा लावला जात असला तरी त्या कामांचे प्रस्ताव व देयकांच्या फायली लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. हा कारभार सुसह्य करण्यासाठी प्रशासनाने मुख्य लेखापरीक्षकांना दोन वरिष्ठ लिपिक दिमतीला दिले. त्यानंतरही फायलींच्या कारभाराचा निपटारा होत नसल्याने प्रशासनाने ४ जानेवारी २०१७ रोजी ठोक मानधनावर मधुकर सुर्वे यांची लेखाधिकारी तर प्रभाकर वर्तक यांची सहाय्यक लेखाधिकारी पदावर नियुक्ती केली. त्यामुळे आर्थिक प्रस्तावांसह देयकांच्या फायलींचा निपटारा त्वरित होण्याची आस पालिकेतील विभाग प्रमुखांसह कंत्राटदारांना लागून राहिली. परंतु त्या प्रस्तावांसह देयकांच्या फायलींवर मुख्य लेखापरीक्षकांच्या निर्देशानुसार कडक शब्दांत शेरा मारला जाऊ लागल्याने प्रत्येक प्रस्तावासह फायलींवर विभागप्रमुखांसह अधिकाऱ्यांना मुख्य लेखापरीक्षकांचा उंबरठा झिजविण्यास भाग पाडले जाऊ लागले. त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांकडे धाव घेतली.
टक्केवारीचा कारभार सुरू असतानाही मुख्यलेखापरीक्षकांचा हा आडमुठेपणा कारभार का सुरू आहे, अशी चर्चा कंत्राटदारामध्ये सुरू झाली. अखेर त्याची झळ राजकारण्यांना बसू लागली. त्यातच त्या ठोक मानधनावरील लेखाधिकाऱ्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायीत सादर करण्यात आला. अखेर स्थायीने प्रस्ताव व फायलींवरील सततच्या शेरेबाजीचा वचपा काढण्यासाठी त्या दोन लेखापरीक्षकांच्या मुदतवाढीलाच नकार दिला. यामुळे स्थायीने मुख्यलेखापरीक्षकांचे पंखच छाटल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली असली तरी हे लेखाधिकारी मुदत संपुष्टात येऊनही मुख्यलेखापरिक्षकांच्या वरदहस्तामुळे अद्याप कार्यरत असल्याने राजकीय वर्तूळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.