स्थायीच्या चाव्या अखेर भाजपाकडेच
By admin | Published: April 5, 2016 01:23 AM2016-04-05T01:23:15+5:302016-04-05T01:23:15+5:30
मुंबईत एकीकडे प्रभाग समितीच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपा युतीत तडा गेला असताना ठाण्यात मात्र शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळला आहे
ठाणे : मुंबईत एकीकडे प्रभाग समितीच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपा युतीत तडा गेला असताना ठाण्यात मात्र शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळला आहे. स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे संजय वाघुले यांनी राष्ट्रवादीच्या प्रमिला केणी यांचा ९ विरुद्ध पाच असा पराभव केला. परंतु, काँग्रेसने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.
ठाणे महापालिकेच्या सत्ता स्थापनेच्या राजकारणात पाच वर्षांत एकदा स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाला देण्याचे ठरले होते. त्यानुसार, मागील वर्षीच शब्द शिवसेनेने भाजपाला दिला होता. परंतु, ऐनवेळेस कुरघोडी करून स्थायीच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या. त्यानंतर, आता शेवटचे वर्ष हे भाजपाला देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, शिवसेनेने दिलेला शब्द पाळून भाजपाला स्थायीची संधी दिली. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून संजय वाघुले आणि राष्ट्रवादीकडून प्रमिला केणी या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास कै. अरविंद पेंडसे सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला राष्ट्रवादीचा उमेदवार माघार घेईल, अशी चर्चा सुरू होती. परंतु, केणी यांनी माघार न घेता निवडणूक लढवली. या वेळी झालेल्या मतदानात भाजपाच्या बाजूने ९ आणि राष्ट्रवादीच्या बाजूने ५ मते पडली. त्यानुसार, वाघुले यांचा विजय झाला. अखेरच्या टप्प्यात आता भाजपाच्या हाती स्थायीच्या चाव्या आल्या आहेत.
दरम्यान, मुंबईत प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपा युतीत दरी निर्माण झाली आहे. त्याच धर्तीवर ठाण्यात शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळल्याने स्थायीच्या चाव्या त्यांच्या वाट्याला आल्या. या वेळी काँग्रेसची दोन मते राष्ट्रवादीला मिळतील, अशी शक्यता वाटत होती. परंतु, काँग्रेसने तटस्थ राहून राष्ट्रवादीला एक प्रकारे जोरदार चपराक लगावली आहे.