परवानगीआधीच मंडप उभारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:13 AM2017-08-14T03:13:43+5:302017-08-14T03:13:46+5:30

गणेशोत्सव असेल अथवा नवरात्रोत्सव, यासाठी ठाणे महापालिकेने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे

Permission already to be installed in the tents | परवानगीआधीच मंडप उभारणी सुरू

परवानगीआधीच मंडप उभारणी सुरू

Next

ठाणे : गणेशोत्सव असेल अथवा नवरात्रोत्सव, यासाठी ठाणे महापालिकेने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. तीनुसार मंडपाची परवानगी ३० दिवस आधी घ्यावी, असा नियम असला तरीदेखील त्याआधीच शहरात गणेशोत्सव मंडपउभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पालिकेकडे सादर झालेल्या अर्जांवर अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने आणि गणेशोत्सवाला काही दिवसच शिल्लक असल्याने काही बड्या गणेशोत्सव मंडळांनी आधीच मंडपउभारणीला सुरुवात केली आहे.
गणेशोत्सवांच्या मंडपासाठी एक तृतीयांशपेक्षा जास्त रस्ता अडवू नये, पूर्वपरवानगी ३० दिवस आधी घ्यावी, वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारावा, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस स्टेशन यांची एनओसी बंधनकारक, मंडपांसाठी रस्ते खोदल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, टीएमटी बसमार्गावर १२ फूट रस्ता मोकळा ठेवावा, अशा अनेक अटींची आदर्श आचारसंहिता ठाणे पालिकेने उत्सवांसाठी तयार केली असली, तरी ती यंदाही कागदावरच राहणार आहे. पारंपरिक उत्सवांच्या मार्गात कोणतेही विघ्न निर्माण करू नये, असे अप्रत्यक्ष आदेशच राज्य सरकारकडून जारी झाल्यामुळे पालिकेला आपल्या संभाव्य कारवाईची हत्यारे उपसण्याआधीच म्यान करावी लागणार आहेत. परंतु, यावर काही तोडगा काढता येऊ शकतो, याची चाचपणी आता पालिकेने सुरू केली आहे.
पारंपरिक गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलवली होती. त्या बैठकीला मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी उपस्थित होते.
ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाही त्यात समावेश होता. या बैठकीतील चर्चा प्रामुख्याने मुंबईतील उत्सव, त्यांना भेडसावणाºया समस्या आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत होती. मात्र, बैठकीदरम्यान परंपरागत उत्सवांमध्ये विघ्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, नव्याने ज्या उत्सवांना परवानगी दिली जाईल, ती नियमांच्या काटेकोर चौकटीतच द्यावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, मागील वर्षीदेखील पालिकेच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाºया मंडळांना पालिकेने नोटिसा बजावून एक लाख रुपये भरण्याचे फर्मान काढले होते.परंतु, याला राजकीय विरोध झाल्याने पालिकेला आपली तलवार म्यान करावी लागली होती. आता कुठला निर्णय घेते याकडे लक्ष आहे.
>गणेश मंडळांना आधीच जाणीव
आतादेखील राज्य सरकारकडूनच अप्रत्यक्षरीत्या उत्सव साजरे करण्याबाबत कोणतेही विघ्न न आणण्याचे सांगण्यात आल्याने पालिकेला आपली आदर्श आचारसंहिता अडगळीत टाकावी लागणार आहे.
कदाचित गणेशोत्सव मंडळांनादेखील याची जाणीव आधीच झाली असणार म्हणूनच त्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मंडपउभारणीचे काम सुरू केल्याचे काही ठिकाणी दिसत आहे.
मंडप उभारणीसाठी ३० दिवस आधी परवानगी घ्यावी, अशी पालिकेच्या आदर्श आचारसंहितेत अट आहे. परंतु, आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पालिकेने अद्यापही अर्जांवर निर्णय न घेतल्याने काही मंडळांनी आधीच मंडप उभारणीला सुरुवात केली आहे.

Web Title: Permission already to be installed in the tents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.