डोंबिवलीतील विभा कंपनीच्या जागेत कोविड रुग्णालय सुरू करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:38 AM2021-05-01T04:38:21+5:302021-05-01T04:38:21+5:30
कल्याण : डोंबिवलीतील विभा कंपनीच्या प्रशस्त जागेत कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे मागितली ...
कल्याण : डोंबिवलीतील विभा कंपनीच्या प्रशस्त जागेत कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने ती दिल्यामुळे रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेत ५८० बेडचे रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.
महापालिका हद्दीत महापालिकेच्या सात आणि ९० खासगी कोविड रुग्णालये आहेत. कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू आहे. भविष्यात तिसऱ्या लाटेचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णांसाठी डोंबिवली क्रीडासंकुलातील बंदिस्त सभागृहात व टेनिस कोर्टावर कोविड रुग्णालय सुरू आहे. त्याचबरोबर क्रीडासंकुलात महापालिकेची बीओटी तत्त्वावर कोणार्क कंपनीला विकसित करण्यासाठी दिलेली मालमत्ता आहे. या ठिकाणी २६५ बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. मात्र त्या ठिकाणी पाणी आणि विजेची सुविधा तयार करावी लागणार असल्याने महापालिकेने दुसरी जागा शोधली. क्रीडासंकुलापासून २०० मीटरच्या अंतरावर विभा कंपनी आहे. या कंपनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या कंपनीच्या तयार इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मांडला गेला होता. मात्र कंपनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेने न्यायालयाकडे परवानगी मागितली. कोरोना परिस्थिती पाहता न्यायालयाने महापालिकेस विभा कंपनीच्या इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी सत्य प्रतिज्ञापत्र सादर करा असे सांगितले होते. महापालिकेने सत्य प्रतिज्ञापत्र सादर केले असून, आता पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
....................
महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली यांनी सांगितले की, विभा कंपनीच्या जागेत प्रशस्त कोविड रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच्या कामासाठी एक कोटी ५० लाखांची निविदा काढण्यात आलेली आहे. या रुग्णालयात ३६० ऑक्सिजन आणि २२० आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. रुग्णालय येत्या महिनाभरात सुरू होईल.
...................
विभा कंपनीच्या आवारात कोविड रुग्णालय सुरू करण्यास न्यायालयाची परवानगी मिळाल्याने महापालिकेने क्रीडासंकुलातील कोणार्क कंपनीच्या वास्तूत २६५ बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव तूर्तास स्थगित केला आहे. त्या ठिकाणी केवळ २६५ बेड उपलब्ध होणार होते. विभा कंपनीच्या जागेतील रुग्णालयात ५८० बेड उपलब्ध होणार आहेत.
--------------------