महापालिकेकडून परस्पर सदनिका दुरुस्तीला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:51 PM2020-05-30T23:51:48+5:302020-05-30T23:52:34+5:30
सोसायट्यांना डावलले। रहिवाशांमध्ये भांडणे
मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून गृहनिर्माण संस्थांमध्ये काटेकोर अंमलबजावणी करण्यासह उल्लंघन झाल्यास थेट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची तंबी देणाºया मीरा-भार्इंदर महापालिकेने चक्क गृहनिर्माण संस्थांना डावलून परस्पर सदनिकाधारकांना दुरुस्तीसाठी परवानगी दिली आहे. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भांडणे सुरू झाली असून वाद पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचत आहेत.
कोरोना रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या इमारतीमध्ये नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बाहेरून कोणी इमारतीत परतल्यास वा नातलग आल्यास त्याची तपासणी आरोग्य केंद्रात करण्यास सांगावे असेही कळवले होते. एकूणच सोसायट्यांच्या पदाधिकाºयांवर जबाबदारी टाकून आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. परंतु, महापालिकेने आता इमारतींमधील सदनिकांच्या अंतर्गत नूतनीकरण वा दुरुस्तीच्या कामासाठी सोसायट्यांना न जुमानताच परस्पर परवानगी देण्यास सुरुवात केली आहे.
सोसायटीला डावलून दुरुस्तीसाठी बाहेरून मजूर, कामगार यांची वर्दळ वाढणार असल्याने बहुतांश रहिवाशांनीही विरोध केला आहे. परवानगी आणणारे रहिवासी आम्हाला पालिकेने परवानगी दिल्याचे सांगून संस्थेने विरोध केल्यास त्यांच्याविरोधात थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. तसा प्रकार भार्इंदरच्या कमला पार्क या इमारतीत सुरु आहे. पालिकेने परस्पर परवानगी दिल्याने संस्था व रहिवाशांनी मात्र संसर्गामुळे विरोध दर्शवला आहे.