जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालये सूरु करण्यास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 10:22 PM2021-02-14T22:22:33+5:302021-02-14T22:23:05+5:30
महाविद्यालयातील जागेची उपलब्धता पाहून, 50 टक्केपर्यंत विद्याथ्यांना रोटेशन पध्दतीने सोमवारपासून वर्गात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठाणे : जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगर परिषद कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्यातील उर्वरित संपूर्ण ग्रामीण भागातील व शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील सर्व अकृषी विद्यापीठे, स्वयंअर्थसहय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी परवानगी जारी केली आहे.
महाविद्यालयातील जागेची उपलब्धता पाहून, 50 टक्केपर्यंत विद्याथ्यांना रोटेशन पध्दतीने सोमवारपासून वर्गात प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी निर्गीमत करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे ग्रामीण भागाच्या महाविद्यालयाना बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिकांच्या हद्दीतील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये सुरू करण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांचे आदेश लागू राहणार आहे. तर अंबरनाथ व कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील शाळा सुरू करणेबाबत यथावकाश आदेश पारीत करण्यात येणार आहेत. या आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी झाले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.