ठामपाने दिली रुग्णालयांना लसीकरण केंद्राची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:38 AM2021-05-17T04:38:26+5:302021-05-17T04:38:26+5:30

ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना आणि गृहसंकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणांतर्गत महानगरपालिकेने ठाणे शहरातील जवळपास ...

Permission for vaccination centers to be given to hospitals | ठामपाने दिली रुग्णालयांना लसीकरण केंद्राची परवानगी

ठामपाने दिली रुग्णालयांना लसीकरण केंद्राची परवानगी

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना आणि गृहसंकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणांतर्गत महानगरपालिकेने ठाणे शहरातील जवळपास ८५ रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. दरम्यान, या धोरणांतर्गत पाहिले खासगी आस्थापना लसीकरण केंद्र आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केले असून रोज ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण, याप्रमाणे आतापर्यंत तब्बल दोन हजार २०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे, या उद्देशाने ठाणे महापालिकेच्यावतीने सर्व खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना आणि गृहसंकुले यांच्यासाठी लसीकरण धोरण निश्चित केले आहे. त्याअंतर्गत महापालिकेने आतापर्यंत ८५ खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्रांची परवानगी दिली आहे.

या सर्व रुग्णालयांचे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी महापालिकेने दिले असून लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, त्याचे व्यवस्थापन कसे असायला हवे याची माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली आहे. दरम्यान, या धोरणांतर्गत वर्तकनगर येथील सिद्धिविनायक रुग्णालयाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला ग्रुपच्या जवळपास दोन हजार २०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

या लसीकरण केंद्रावर लस योग्यरित्या संग्रह करण्याची जबाबदारी बिर्ला ग्रुपची असून सिद्धिविनायक हॉस्पिटलने एक वैद्यकीय अधिकारी, तीन व्हॅक्सिनेटर आणि सहा इतर मेडिकल स्टाफ अशी दहा जणांची नेमणूक याठिकाणी केली आहे. लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असून सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणीही केली आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून आता वागळे इस्टेट येथील आयआयएफएल या खासगी आस्थापनामध्येदेखील लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्या आस्थापनांना लसीकरण केंद्र सुरू करावयाचे आहे, त्यांनी पुरवठाधारकांकडून लस उपलब्ध करून लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. महापालिकेकडून फक्त लसीकरण केंद्राच्या तांत्रिक बाबीसंदर्भात महापालिकेच्यावतीने मार्गदर्शन केले जाणार आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टास्क फोर्सच्या माध्यमातून ठाण्यात आतापर्यंत ८५ नवीन खासगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

Web Title: Permission for vaccination centers to be given to hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.