त्या ५८० दुकानांना विनाचर्चा दिली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:35+5:302021-09-22T04:44:35+5:30
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील मांस विक्रीच्या ९५० पैकी ५८० बेकायदा दुकानांमधील त्रुटींवर शुल्क आकारून ...
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील मांस विक्रीच्या ९५० पैकी ५८० बेकायदा दुकानांमधील त्रुटींवर शुल्क आकारून व्यवसायाची परवानगी देण्याच्या प्रस्तावास सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोणत्याही चर्चेविना मंजुरी दिली. या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे बेकायदा व्यवसाय करणाऱ्या मांस विक्रीच्या दुकानदारांना अभय मिळाले आहे. त्यांना आता जुजबी शुल्क भरून व्यवसाय परवाने मिळविणे शक्य होणार आहे.
या ५८० दुकानांना परवानगी नसल्याने त्यांच्याकडून वर्षाकाठी ठामपा दोन लाखांचा दंड वसूल करते. ५८० पैकी ३९० दुकांनाना गेली अनेक वर्षे ते व्यवसाय करीत असून यापैकी अनेक जण मालमत्ता कर भरत नाहीत. यामुळे महापालिकेचे दुहेरी नुकसान होत आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार तयार केलेल्या अटी तसेच शर्तींची पूर्तता होईपर्यंत या दुकानदारांकडून अटी तसेच शर्तींच्या प्रत्येक त्रुटीनुसार शुल्क वसूल करण्यात येणार आहे. त्याचे दरही पालिकेने निश्चित केले आहेत. शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत ते आहे. ५० मीटर त्रिजेच्या परिसरातील धार्मिक स्थळ, कार्यशाळा किवा शैक्षणिक संस्थेला तसेच पाच मीटर अंतरात दुकानाच्या बाजूला केशकर्तनालय, कोळशाचे दुकान, पिठाची गिरणी, दवाखाना नसणे या अटी आणि शर्ती शिथिल करून त्रुटीची कमतरता असलेल्या दुकानांना परवाना देताना त्यांच्याकडून हे शुल्क वसूल केले जाणार आहे.