जाफ्रबादच्या बोटीवर पर्ससीनचा हल्ला
By admin | Published: November 26, 2015 01:31 AM2015-11-26T01:31:02+5:302015-11-26T01:31:02+5:30
पर्ससीन नेटधारकांची समुद्रातील दहशत दिवसेंदिवस वाढत असून शेकडोंच्या झुंडीने मासेमारीसाठी आपल्या भागात आलेल्या जाफ्रबाद (गुजरात) येथील परंपरागत
हितेन नाईक, पालघर
पर्ससीन नेटधारकांची समुद्रातील दहशत दिवसेंदिवस वाढत असून शेकडोंच्या झुंडीने मासेमारीसाठी आपल्या भागात आलेल्या जाफ्रबाद (गुजरात) येथील परंपरागत मच्छीमारांनी मज्जाव केल्याने नाव, नंबर नसलेल्या ट्रॉलर्सनी त्या मच्छीमारांवर जोरदार दगडफेक सुरू केली. तर लिंबाभाई बारीया यांच्या अखिलभ (वेणुप्रसाद) बोटीना ठोकर मारून ती बुडविण्यात आली. यावेळी बोटीतील आठ खलाशानी मिळेल त्या आधाराच्या सहाय्याने आपला जीव वाचविण्यात यश मिळविले.
पालघर, वसई, डहाणूच्या समोरील समुद्रात झुंडीच्या झुंडीने ८ ते १० नॉटीकल निषिद्ध क्षेत्रात येऊन हजारो टन मासे पर्ससीन नेट नौकाधारक पकडून नेत आहेत. आधीच पालघर जिल्ह्णातील मच्छीमारांना ओएनजीसीच्या तेल विहिरीमुळे मासेमारीसाठी क्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे नेहमीच समुद्रात स्थानिक मच्छीमार व पर्ससीन धारकांमध्ये संघर्ष होतो. मागच्या आठवड्यात करंजा येथील दोन पर्ससीन धारक बोटीनी पालघर, डहाणू भागातील १२ ते १५ टन घोळ मासे पकडून नेल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
गुजरात राज्यातील जाफ्रबाद येथील देवासी येथील रहिवासी असलेले लिंबाभाई बारीया यांची वेणुप्रसाद डीजे १२ एम. एम. २९८ ही नौका मासेमारीसाठी १९ नोव्हेंबर रोजी समुद्रात गेली होती. परंतु समुद्रात टाकलेल्या जाळ्यात पुरेसे मासेच मिळत नसल्याने सर्व मच्छीमार हताश झाले होते. त्याचवेळी २१ नोव्हेंबर रोजी वेणुप्रसाद बोटीतील खलाशानी समुद्रात जाळी सोडल्यानंतर ते पुन्हा बोटीत जाळी घेण्याची प्रतिक्षा करीत असताना मोठ्या संख्येने पर्ससीन नेट धारक बोटींनी मासेमारीला सुरूवात केली. त्यावेळी काही परंपरागत मच्छीमारांनी त्यांना मासेमारी करण्यास विरोध केला. यावेळी झालेल्या वादावादीदरम्यान पर्ससीन वाल्यांनी परंपरागत मच्छीमारांवर दगडांचा (घाटे) वर्षाव सुरू केला. त्यानंतर पर्ससीनबोटींनी वेणुप्रसादला जोरदार धडका देऊन ती बुडवली. त्यामुळे भेदरलेल्या आठ खलाशांना आपला जीव वाचविण्यासाठी आपल्या बोटीतील प्लॅस्टीक ड्रम, लाकडी फळ्या इ.चा सहारा घेतला. या पर्ससीन ट्रॉलर्सवर नाव आणि नंबर नसल्याचे जिग्नेशभाई बारीया यांनी सांगितले. अनेक तास ड्रम, लाकडाच्या आधारावर पोहल्यानंतर रुपारेल नावाच्या जाफ्रबाद येथील बोटीना हे खलाशी मदतीसाठी हातवारे करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या खलाशांचे प्राण वाचविले.
आमचे परंपरागत मच्छीमार मत्स्य जतनासाठी प्रयत्नशील असताना समुद्रातील मत्स्यसंपदा लुटणाऱ्यांवर शासन कारवाई करीत नाही. शासन व त्यांचे अधिकारी जर बेकायदेशीर पर्ससीन धारकांना पाठीशी घालीत असतील तर समुद्रात आम्ही त्यांच्या विरोधात लवकरच आंदोलन पेटवू.
- नरेंद्र पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती