पर्ससीनधारकांची दादागिरी थांबेना
By admin | Published: January 21, 2016 02:29 AM2016-01-21T02:29:25+5:302016-01-21T02:29:25+5:30
मत्स्यव्यवसाय विभागाचे कुठलेही नियंत्रण पर्ससीन नेटधारकांच्या बेकायदेशीर मासेमारीवर राहिले नसल्याने त्यांचा पालघर तालुक्यातील स्थानिक मच्छीमा
पालघर : मत्स्यव्यवसाय विभागाचे कुठलेही नियंत्रण पर्ससीन नेटधारकांच्या बेकायदेशीर मासेमारीवर राहिले नसल्याने त्यांचा पालघर तालुक्यातील स्थानिक मच्छीमारी क्षेत्रातील धुडगूस सुरूच राहिला आहे. सोमवारी वडराईच्या मच्छीमारी कव क्षेत्रात घुसून कवीची नासधूस केल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या छोट्या मच्छीमारांवर चालून जात त्यांच्या बोटी बुडवून टाकण्याची धमकी पर्ससीन ट्रॉलर्सनी दिल्याने सर्व मच्छीमारांना मासेमारी न करता रिकाम्या हाती परतावे लागले आहे.
किनाऱ्यापासून १२ नॉटीकल मैल क्षेत्रापर्यंत राज्य शासनाची हद्द असून या भागात मासेमारी करण्यास पर्ससीन ट्रॉलर्सधारकांना बंदी आहे. अशा वेळी निषिद्ध क्षेत्रात घुसखोरी करीत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर कारवाई करण्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त पालघर विभाग गस्ती नौका नसल्याचे कारण अनेक वर्षांपासून पुढे करीत असल्याने पर्ससीनधारकांना कारवाईची भीती उरली नाही. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने स्थानिक मासेमारी क्षेत्रात येऊन मोठ्या प्रमाणात मासे घेऊन जात आहेत. अशा वेळी स्थानिकांच्या कवीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शासनाकडून याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने आपल्या मत्स्यसंपदेची लूट उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय त्यांच्यापुढे कुठलाही पर्याय उरलेला नाही.
सोमवारी (१८ जानेवारी) वडराई मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभासद असलेली रमेश नारायण मेहेर यांची ‘विश्वसाई’ मोरेश्वर, रघुनाथ मेहेर यांची ‘अमरलक्ष्मी’, जितेंद्र धनु यांची ‘कावेरी’ चंद्रकांत नारायण मेहेर यांची ‘तेजस्विनी’, प्रल्हार धनू यांची ‘न्यू देवता’, अनिल धनू यांची ‘ओम साईश्रद्धा’, अशोक धनू यांची ‘शांता दुर्गा’ या २० ते २५ नौका वडराईच्या किनाऱ्यावरून समोर १० नॉटीकल क्षेत्रात आपल्या कवीवर मासेमारी करीत असताना मुंबईच्या कुलाबा धक्क्यावरून आलेल्या श्री साईची पालखी (आयएनडी-एमएच१-एमएम ६३८६), रामेश्वरी प्रसाद (आयएनडी-एमएच१-एमएम ९३३), माता वैष्णवीसाई (आयएनडी-एमएच७-एमएम १९६) या पर्ससीनधारक ट्रॉलर्सनी समुद्रात सोडलेले पर्ससीन जाळे वडराईतील कवीमध्ये (खुंटाला) अडकले, त्या वेळी आलेल्या जोरदार प्रवाहामुळे वडराईच्या मच्छीमारांच्या कवीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचा व तुम्ही निषिद्ध क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी आल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडराईच्या स्थानिक मच्छीमारांना धमक्या देत पर्ससीनधारकांनी वायरलेस सेटवरून इतर सहकाऱ्यांना बोलवून घेतले. या वेळी झालेल्या बाचाबाचीनंतर पर्ससीन ट्रॉलर्सधारकांनी वडराईच्या मच्छीमारांच्या नौकाच्या अंगावर ट्रॉलर्स घालून बुडवून टाकण्याची धमकी दिल्याचे रमेश मेहेर या मच्छीमारांनी सांगितले. (वार्ताहर)