स्वीकृत नगरसेवक नियुक्तीविरोधात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 11:37 PM2020-12-05T23:37:18+5:302020-12-05T23:38:07+5:30
Mira Bhayander Municipal Corporation : मीरा-भाईंदर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या सदस्यांच्या निश्चित केलेल्या ५ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
मीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या सदस्यांच्या निश्चित केलेल्या ५ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासाठी असणारे निकष व पात्रता डावलून एकाच संवर्गातील उमेदवारांना सदस्यत्व देण्याचा प्रयत्न असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्याने उपस्थित केला आहे.
पक्षीय बलानुसार भाजपचे ३ तर शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी १ स्वीकृत सदस्य होणार असताना भाजपकडून ४ जणांचे अर्ज आले होते. भाजपच्या सोहनराज राजपुरोहित यांनी अर्ज मागे घेतल्याने जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले, माजी नगरसेवक भगवती शर्मा व निवृत्त पालिका अधिकारी अजित पाटील, तर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख विक्रमप्रताप सिंह व काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक शफिक खान या पाच जणांचे अर्ज कायम राहिले. यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव ४ डिसेंबरच्या महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या विरोधात भाईंदरमधील रहिवासी नितीन मुणगेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्यायालयात याचिका दाखल असल्याने स्वीकृत सदस्य नियुक्ती करू नये, अशी विनंती याचिकाकर्ता आणि त्यांचे वकील ॲड. पृथ्वीराज गोळे यांनी महापालिकेसह आयुक्त, महापौर आदींना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. स्वीकृत सदस्य हा डॉक्टर, वकील, शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, लेखापाल, अभियांत्रिकी पदवीधारक, महापालिकेचा निवृत्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच सामाजिक संघटनेचा पदाधिकारी आदी वर्गवारीतील असायला हवा असे याचिकेत म्हटले आहे.