वाढत्या महागाईच्या विरोधात युवासेनेतर्फे 'थाळी बजाओ' आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 07:01 PM2022-04-03T19:01:01+5:302022-04-03T19:01:31+5:30
महागाईच्या भडक्याने सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागतंय : वरुण सरदेसाई
उल्हासनगर : मोदी सरकार काळात घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आदींच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाईचा भडका उडल्याच्या निषेधार्थ युवासेनेच्या वतीने शिवाजी चौकात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेनेचे वरून सरदेसाई, युवा शहर अधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
केंद्रात मोदी सरकार येण्यापूर्वी घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमती बद्दल मोदी सरकारमध्ये मंत्रिपदावर असलेल्या स्मृती इराणी यांच्यासह अन्य जणांनी देशभर आंदोलन केली. नागरिकांना अल्प दरात घरगुती गॅस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन डिझेल व पेट्रोलच्या किंमती कमी ठेवण्याचे आश्वासन दिले होते. आज डिझेलने शंभरी पार केली असून पेट्रोल १२० रुपयांच्या पुढे गेले. तर घरगुती गॅस एक हजारावर गेले. या महागाईच्या भडक्याने, सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केला. मोदी सरकारची झोप उडविण्यासाठी व त्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी शिवाजी चौकात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आल्याची माहिती युवा शहर अधिकारी बाळा श्रीखंडे यांनी दिली.
शिवसेनेचे कल्याण उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेनेचे नेते केतनजी नलावडे, युवशहर अधिकारी बाळा श्रीखंडे, सुशील पवार यांच्या उपस्थितीत थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.